मुंबई : नवीन जालना येथील सिडकोच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तत्वत: मान्यता दिली. पाणी उपलब्धता आणि अन्य अनुषंगिक सुविधा व प्रकल्प विकसित झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरण याबाबत सविस्तर अभ्यास करून पुन्हा अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जालना जिल्ह्यातील खासदार रावसाहेब दानवे, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेवराव जानकर, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, जालना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित जालना सिडको प्रकल्प हा खारपुडी गावात होणार आहे. सिडकोची नियुक्ती ही विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून करण्यात आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी पर्यावरण सल्लागाराची नियुक्ती करून अहवाल सप्टेंबर 2011 रोजी प्रधान सचिवांना सादर करण्यात आला आहे. खारपुडी गावातील एकूण क्षेत्रापैकी 559.36 हेक्टर इतके क्षेत्र रहिवास प्रभागात समाविष्ट असून उर्वरित 650.65 हेक्टर क्षेत्र हरित भागात समाविष्ट आहे. या क्षेत्रावर शहर विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.