जिल्हाधिकारी कार्यालयात निरोप व स्वागत समारंभ
नागपूर : माणसं सगळी कमी-जास्त पातळीवर समान असतात. मात्र त्यांना असामान्य बनवते ती त्यांनी सामना केलेली परिस्थिती. कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपला परिवार, आपले आरोग्य कसोटीवर लागले असतानाही तुम्ही केलेले कार्य, दिलेली साथ केवळ अविस्मरणीय आहे, अशा शब्दात आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावतीने गुरुवारी एका भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवनियुक्त जिल्हाधिकारी विमला आर. यांचे स्वागत व यापूर्वीचे जिल्हाधिकारी तथा सध्याचे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांचा निरोप असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा उपस्थित होत्या. विभागीय आयुक्तांनी दोन्ही अधिकाऱ्यांना नव्या जबाबदारीच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी विमला आर. व आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी परस्परांना नव्या पदग्रहणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमती जोत्सना ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
छोटेखानी या पारिवारिक कार्यक्रमात स्वागताच्या कार्यक्रमानंतर रवींद्र ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षात अत्यंत कठीण परिस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना कार्य केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा नामोल्लेख करीत गौरव केला. अनेकांच्या व्यक्तिगत समस्यांचा देखील हा कालावधी होता. मात्र ज्या समाजाने अधिकारी म्हणून कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत सामाजिक दायित्व पार पाडण्याची जबाबदारी सोपवली. त्या समाजाला संकटाच्या काळात मदत करताना प्रत्येकाने प्रयत्नांची पराकाष्टा केल्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या काळात अनेक वेळा 18 ते 20 तास कर्मचाऱ्यांना काम करावे लागले. मात्र तरीही दिलेली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली. समाजाने देखील या कामाची नोंद घेतली आहे. सरकारी सेवेमध्ये अशा पद्धतीची आपदा क्वचित येते. मात्र असे संकट आल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याची कसोटी लागते. हीच वेळ असते ज्यावेळी समाजाचे दायित्व आपण पूर्ण करायचे असते… आणि त्यासाठी सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे व तत्परतेने सेवा दिल्याबद्दलही त्यांनी कौतुक केले. नवनियुक्त जिल्हाधिकारी विमला आर त्यांनी यावेळी श्री. ठाकरे यांना नव्या पदग्रहणाच्या शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन श्री. रवींद्र ठाकरे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार चैताली सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसीलदार निलेश काळे यांनी केले.