- योजनेवर 217 कोटी रुपये खर्च होणार
- 1275 किलोमीटरच्या 45 गावठाण वाहिन्या उभारणार
- जिल्ह्यात वीज यंत्रण सक्षमीकरणासाठी एकूण 1150.50 कोटीची कामे
- 857 वितरण रोहीत्रे उभारणार
नागपूर: केंद्र सरकार पुरस्कृत दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अखंडित वीज पुरवठ्यासाठी 45 गावठाण वाहिन्या उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून त्यांच्या कार्यान्वयनानंतर जिल्ह्यातील 465 गावांना अखंडित आणि योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत मिळणार आहे. या सर्व वाहिन्या डिसेंबर 2018 पर्यंत कार्यान्वित करण्याच्या सुचना महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफ़ीक शेख यांनी दिल्या आहेत.
सद्यस्थितीत असलेल्या वीज वितरण यंत्रणेचे सशक्तिकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या सहकार्याने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजनांमधून नागपूर जिल्ह्यातील वीज यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी राज्याचे ऊर्जा, नवीन व नविकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकारामुळे केंद्र आणि राज्य शासनाकडून 1150.50 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून त्यापैकी दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेंतर्गत मंजूर 217 कोटींची कामे पुर्णत्वाकडे असून ही सर्व कामे येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
या योजनेतील कामांच्या पुर्णत्वानंतर जिल्ह्यातील 465 गावांना योग्य दाबाने आणि अखंडित वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. या कामांचे कंत्राट ऑन लाईन निविदा प्रक्रिये मार्फ़त मेसर्स भारत इलेक्ट्रिकल लिमिटेडला देण्यात आले आहे. या योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यात 1275 किमी लांबीच्या 45 गावठाण वाहिन्यांची उभारणी सुरु असून वीज ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठ्यासाठी 857 रोहित्रांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रस्तावित 45 पैकी तीन गावठाण वाहिन्या कार्यान्वित झाल्या असून दोन गावठाण वाहिन्याचे काम पूर्ण झाले आहे तर 15 वाहिन्यांची कामे येत्या एप्रिल अखेरीस पूर्ण होणार आहेत.
या नवीन गावठाण वाहिन्यांमुळे सद्या असलेल्या वाहिन्यांवरील वीज भार कमी होण्यासोबतच वाहीनीची लांबी देखील कमी होणार असल्याने ग्राहकांकडील विद्युत उपकरणे खराब होण्याच्या प्रकाराला आळा बसेल, शिवाय या वाहीन्यांवरील घरघुती ग्राहकांना अखंडित, उच्च प्रतीचा आणि योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळण्यासोबतच वितरण रोहीत्रे नादुरुस्त होण्याचे प्रकारही कमी होणार आहेत. या सर्व गावठाण वाहिन्या डिसेंबर 2018 पर्यंत कार्यान्वित करण्याच्या सुचना मुख्य अभियंता रफ़ीक शेख यांनी संबंधित कंत्राटदाराला दिल्या आहेत.