Published On : Thu, Apr 29th, 2021

आरोग्याची काळजी घेत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करावा

Advertisement

मुंबई: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात संचारबंदी व वर्क फ्रॉम होम सुरु झाले आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढत असून काही भागात मान्सूनपूर्व वादळी पाऊस होत आहे. या पार्श्वभूमिवर महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज राहावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी केली आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रामुख्याने कोविड व इतर सर्व रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती व रिफिलींग उद्योगांसह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. सध्या संचारबंदी व कार्यालयीन उपस्थितीच्या निर्बंधांमुळे खासगी व शासकीय कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉर्म होम सुरू आहे. त्यातच उन्हाची तिव्रता वाढत असल्याने विजेची मागणीही वाढत आहे. राज्यात वाढत्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यास महावितरण सक्षम आहे.

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र मान्सूनपूर्व वादळी पावसाला राज्याच्या काही भागात सुरवात झाली आहे. अशा परिस्थितीत सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर सज्ज राहावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी केली आहे. वादळी पाऊस किंवा अन्य कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्यास युद्धपातळीवरील दुरुस्ती कामांद्वारे किंवा पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याची कार्यवाही करावी. सोबतच वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले आहे.

सध्याची कोरोना लाट महावितरणकरिता अतिशय कसोटीची आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सेवा देतांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घ्यावी. कोविडबाधित कर्मचारी व कुटुंबियांना सर्व प्रकारची आवश्यक वैद्यकीय व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी परिमंडलस्तरावरील समन्वय कक्षांमार्फत कामे सुरु आहेत. नियमित व कंत्राटी सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये प्रतिबंधात्मक उपायांकडे कोणतेही दुर्लक्ष करू नये. आरोग्याची गंभीरपणे काळजी घ्यावी. थोडीही लक्षणे दिसल्यावर ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्व कर्मचाऱ्यांनी स्वत:सोबतच आपल्या सहकाऱ्यांची व कुटूंबियांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement