नागपूर – हजरत बाबा ताजुद्दीन दरगाह ताजबाग येथे १० ऑगस्टपासून होऊ घातलेल्या १०१ व्या उर्सच्या आयोजनाचा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) आढावा घेतला.
मंत्री महोदयांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला आमदार प्रवीण दटके, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान आदींची उपस्थिती होती. प्यारे खान यांनी उर्सच्या आयोजनाच्या संदर्भात माहिती दिली. यावर्षी उर्सचे १०१ वे वर्ष असून भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना ना. श्री. गडकरी यांनी प्रशासनाला व दर्गा समितीला दिल्या. उर्ससाठी १५ लाखांपेक्षा जास्त भाविक याठिकाणी येतील.
त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. रस्त्यांवर अतिक्रमण नको, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था हवी, वीजपुरवठा खंडीत होऊ नये, पार्किंगची व्यवस्था करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आदींबाबत ना. श्री. गडकरी यांनी प्रशासनासोबत व समितीच्या सदस्यांसोबत चर्चा केली. ताजबाग हे लाखो भाविकांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. याठिकाणी येणाऱ्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी कुठल्याही अडचणींचा सामना करण्याची वेळ येऊ नये, याची पूर्ण काळजी घेण्याची सूचना ना. श्री. गडकरी यांनी केली.