नागपूर – कुठल्याही जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन साहित्यिक चळवळ लोकाभिमुख होणे ही काळाची गरज आहे. तरच समाजाला संस्कारित करून, समाजाचे प्रबोधन करून ही चळवळ भविष्यात प्रतिभावान पिढी तयार करेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केला. विदर्भ साहित्य संघाच्या १०१व्या वर्धापन दिन सोहळ्याला तसेच वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विदर्भ साहित्य संघाच्या रंगशारदा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामध्ये डॉ. मधुकर जोशी यांचा ‘साहित्य वाचस्पती’ ही उपाधी देऊन तर, ज्येष्ठ कवयित्री आशा पांडे यांचा साहित्य सेवा गौरव पुरस्कार प्रदान करून ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते अध्यक्षस्थानी होते. तर डोंबिवलीच्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, अंमळनेर येथे होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, साहित्य संघाचे विश्वस्त न्या. विकास सिरपूरकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, सरचिटणीस विलास मानेकर, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र डोळके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विदर्भ साहित्य संघाच्या वतीने विविध साहित्यिक पुरस्कारांनी विदर्भातील साहित्यिकांना गौरविण्यात आले. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘साहित्यात आणि साहित्यिकांमध्ये समाज बदलण्याची ताकद आहे.
त्यामुळे साहित्यिक चळवळ समन्वय आणि सौहार्दातून पुढे नेण्याची गरज आहे. त्यासोबत शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुलांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून या चळवळीशी जोडले पाहिजे. त्यातून उद्याचे प्रतिभावान साहित्यिक तयार होतील. नव्या पिढीपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. भाव तसाच ठेवून माध्यम बदलले तर त्याचा नक्कीच फायदा होईल.’ ‘विदर्भ साहित्य संघाचा शंभर वर्षांचा देदीप्यमान इतिहास आहे. इथली माणसं बदलत गेली, पण हा इतिहास जवळून बघणाऱ्यांना प्रतिभावान साहित्यिकांचा सहवास लाभला.
मी विद्यार्थी असताना न्या. रानडे वाद विवाद स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदा साहित्य संघात आलो होतो. त्याकाळात ग.त्र्यं. माडखोलकर, राम शेवाळकर, मधुकर आष्टीकर, कवी अनिल, टी.जी. देशमुख यांच्यासारखी प्रतिभावान मंडळी साहित्य संघात होती. त्यानंतर प्रा. सुरेश द्वादशीवार साहित्य संघाचे अध्यक्ष होते. प्रत्येकाच्या प्रतिभेने साहित्य संघाचा इतिहास समृद्ध केला,’ असेही ते म्हणाले. वर्धा येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समाजव्यापी करून ते खेड्यापाड्यातील ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविल्याबद्दल प्रदीप दाते यांचे ना. श्री. गडकरी यांनी अभिनंदन केले. विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष स्व. मनोहर म्हैसाळकर यांचे संस्थेचा डोलारा सांभाळण्यात मोठे योगदान आहे, असा उल्लेख त्यांनी केला. सूत्रसंचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.