नागपूर – जात-पात, धर्माच्या पलीकडे जाऊन काम करण्याचे संस्कार आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजाच्या कल्याणासाठी, त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी गेल्या दहा वर्षांत भरपूर कामे केली. उत्तर नागपूर हा शहराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि या परिसराचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) केले.
टेका नाका येथील प्रल्हाद लॉनवर उत्तर नागपूर भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकाऱ्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. संजय भेंडे, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, ज्येष्ठ नेते श्री. प्रभाकरराव येवले, श्री. वीरेंद्र कुकरेजा, महामंत्री अश्विनी जिचकार, श्री. अशोक मेंढे, श्री. द्वारकाप्रसाद यादव, संजय चौधरी, नवनीतसिंग तुली, राजेश हाथीबेड आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार असल्याचा आरोप होतो. पण संविधान बदलण्याचे प्रयत्न काँग्रेसच्याच काळात सर्वाधिक वेळा झालेत. आपल्याबद्दलचा अपप्रचार काँग्रेस करीत आहे. आम्ही दलितांच्या, संविधानाच्या विरोधात असतो तर दीक्षाभूमीचा एवढा विकास झाला नसता. आजही विकास कामे सुरू आहेत. हजारो रुग्णांच्या हृदयविकार शस्त्रक्रिया केल्या, कित्येकांना कृत्रिम अवयव लावून दिलेत. दिव्यांगांसाठी पार्क तयार केला आहे. ही कामे करताना कधीही जात-पात-धर्माचा विचार केला नाही.’ मी गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान मानतो. समता हा माझा जीवन मंत्र आहे. मंत्री झाल्यावर मी २२ हजार कोटी रुपयांचे बुद्ध सर्किटचे काम केले, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
‘उत्तर नागपूरमध्ये मिळेल मोठी आघाडी’
मला विश्वास आहे की, कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे उत्तर नागपुरातून चांगली आघाडी मिळेल, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. त्यासाठी दहा वर्षांत झालेली विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवावी लागतील, असेही ते म्हणाले.
असा होतोय विकास
या शहरात कोणती कामे झालीत, हे लोकांना दिसत आहे. उत्तर नागपुरातील रस्ते काँक्रिटचे झाले, चोवीस तास पाण्याची सुविधा झाली, मेट्रो आली, रिंग रोड पूर्ण झाला. आता उत्तर, पूर्व व मध्य नागपूरला जोडण्यासाठी अंडरपास, उड्डाणपूल झाले. नवीन उड्डाणपूल तयार होतोय. कमाल टॉकीज चौकात देशातील उत्तम असे मार्केट होणार आहे. उत्तर नागपूरच्या विकासात महत्त्वाचे काम म्हणजे नाग नदीच्या २४०० कोटींच्या कामात पिवळी नदीचेही काम होणार आहे. नवीन ड्रेनेज लाईन तयार होणार आहे, असे ना. श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले.
‘सिकलसेल मुक्तीचा ध्यास
उत्तर नागपुरातील सर्वांत मोठी समस्या म्हणजे येथील १ लाख लोक सिकलसेल आणि थॅलेसिमियाने ग्रस्त आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आपण मुलांचे ऑपरेशन करून त्यांचे प्राण वाचवले. आता सर्व रुग्णांच्या निःशुल्क उपचारासाठी प्रयत्न सुरू आहेत. मला उत्तर नागपूरला सिकलसेलमुक्त करायचे आहे, असा निर्धार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
‘साहेब, तुम्ही नाही, आम्ही लढतोय’
अनेक वर्षे उत्तर नागपूर विकासापासून वंचित होता, तुम्ही चेहरा-मोहरा बदलला. त्यामुळे ही निवडणूक तुम्ही नाही, आम्ही लढतोय. इथला प्रत्येक बुथ कार्यकर्ता स्वतः निवडणुक लढणार आहे, असा विश्वास मंडळ अध्यक्ष गणेश कानतोडे यांनी व्यक्त केला.