नागपूर :होळी… रंगांचा, उत्साहाचा आणि सामंजस्याचा सण आहे. जिथे आनंदाच्या विविध छटा आसमंतात दरवळतात आणि नात्यांचे रंग अधिकच गडद होतात. मात्र, हा सण येतो तेव्हा पोलिसांसाठी तो केवळ ड्युटी आणि बंदोबस्ताची आठवण करून देतो. नागपूर शहरातील पोलीस अमलदार आणि अधिकारी सकाळपासून रात्रीपर्यंत कायदा-सुव्यवस्थेच्या जबाबदारीत मश्गूल असतात, आणि त्यांच्या हातात रंगांऐवजी रहातात फक्त कर्तव्याचे ओझे !
परंतु या परिस्थितीत एक नवा रंग भरण्याचा संकल्प नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी केला. त्यांनी पोलीस दलातील अधिकारी, अमलदार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज, १५ मार्चला सकाळी ८.०० वाजता, पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर, सहकुटुंब धुलीवंदनाचा उत्सव आयोजित केला. एक दिवस असा असावा, जिथे कर्तव्याचे बंधन बाजूला ठेवून, फक्त उत्सवाचा आनंद घेता यावा या संकल्पनेतून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या उत्सवात, पोलीस मुख्यालयाचे मैदान विविध रंगांनी भरून गेले. गुलाबी, जांभळे, हिरवे आणि केशरी अशा विविध रंगांची उधळण , पोलिसांचे हसरे चेहरे, मनमोकळ्या गप्पा आणि संगीताच्या लयीत ताल धरलेले पाय असे दृश्य मैदानावर दिसत होते. स्वतः पोलीस आयुक्त आपल्या पत्नीसमवेत मैदानात आले. सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला. पोलीस अमलदार त्यांचे कुटुंबीय आणि अगदी लहानग्यांनीही या रंगोत्सवात मनसोक्त सहभाग घेतला.
होळीच्या पार्श्वभूमीवर कालच पोलिसांनी सकाळी ५ पासून ते रात्री १२ पर्यंत शहराच्या सुरक्षिततेसाठी चौखपणे बंदोबस्त पार पडला. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू दिला नाही. सर्वत्र शांतता राहिली. कनिष्ठांपासून वरिष्ठ हे शहरात गस्त घालत होते. आज, त्याच पोलिसांचा थकवा या रंगांच्या लयीत विरघळून गेला. हातात लाठीऐवजी गुलाल होते, आणि चेहऱ्यावर तणावाऐवजी हास्याची चंद्रकोर उमटली होती.पोलीस आयुक्तांनी आपल्या मनोगतातून हा संदेश दिला की, कर्तव्य महत्त्वाचे आहे, पण त्याचबरोबर मानसिक आनंदही तितकाच आवश्यक आहे. नागपूर पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच असा कार्यक्रम पार पडला आणि त्यामुळे हा क्षण अविस्मरणीय ठरला. अशा कार्यक्रमांमुळे पोलीस दलास तणावमुक्त राहण्यास मदत होते.
या रंगोत्सवाला सह पोलीस आयुक्त निसार तांबोळी, अपर पोलीस आयुक्त श्री संजय पाटील, शिवाजी राठोड, प्रमोद शेवाळे, पोलीस उप आयुक्त निकेतन कदम, अश्विनी पाटील, श्वेता खेडकर, राहुल मदने, शशिकांत सातव तसेच सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांच्या पत्नी वनिता सिंगल यांची विशेष उपस्थिती होती. त्या मुंबईहून नागपूरला आल्या होत्या. डीसीपी निकेतन कदम आणि त्यांच्या पत्नीनेही या सोहळ्यात रंग मिसळले. संगीताच्या तालावर प्रत्येक पाऊल थिरकत होतं, कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला,