मुंबई: शासनाच्या विविध विभागांमार्फत महिला आणि बालकांसाठी योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या स्तरातील महिलेला मिळतो किंवा नाही, योजना सुरु करण्यामागची उद्दिष्टपूर्ती होते किंवा नाही हे पाहण्यासाठी, येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना सुचविण्यासाठी आज यूएन विमेन आणि युनिसेफसोबत करण्यात आलेला सामंजस्य करार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे, प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आज यू एन विमेन आणि युनिसेफसोबत आऊट ले ते आऊट कम साठीचा सामंजस्य करार वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महिला व बाल विकास सचिव विनिता सिंगल, आदिवासी विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, युनिसेफच्या महाराष्ट्रातील प्रतिनिधी राजेश्वरी चंद्रशेखर आदी उपस्थित होते.
संधी, समानता आणि महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा अभ्यास आणि उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या असून, त्यातून महिला आणि मुलींसाठीच्या योजना अधिक प्रभावी आणि सक्षमपणे राबविणे , त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणे शक्य होईल असे सांगून श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत सहनशीलता अधिक असते. त्याबरोबरच त्या अर्जुनासारखे लक्ष केंद्रीत करून त्या पुढे जाऊ शकतात त्यांच्या या क्षमतांचा राज्य विकासात सहभाग घेतल्यास राज्य अधिक वेगाने पुढे जाईल. अर्थमंत्री म्हणून महिला आणि मुलींच्या विकासासाठी राज्याचा वित्त विभाग पूर्ण क्षमतेने त्यांच्या पाठी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महिला व बालविकास विभागाच्या “पब्लिक एक्सपेंडिचर रिव्ह्यू” या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.