महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पुष्पा उराडे आणि उपसभापतीपदी शितल कुळमेथे
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संदीप आवारी यांची, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पुष्पा उराडे आणि उपसभापतीपदी शितल मारोती कुळमेथे यांची अविरोध निवड झाली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २१(१) (५) तरतुदी अन्वये चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या स्थायी समिती सभापती व महिला व बालकल्याण समिती पदासाठी विशेष बैठक पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ता. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नवीन प्रशासकीय इमारतीत दुसरा माळा, राणी हिराई सभागृहात पार पडली. यावेळी मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती होती.
दरम्यान, रविवार, ता. १० रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. ११ रोजी सभा सुरु झाल्यावर नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली. त्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी १५ मिनिटाचा कालावधी देण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाकडून संदीप आवारी यांनी नामांकन दाखल केले होते. एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी संदीप आवारी यांची अविरोध निवड जाहीर केली. त्यानंतर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पुष्पा उराडे आणि उपसभापतीपदी शितल मारोती कुळमेथे यांची अविरोध निवड झाली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहीते यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.