नागपूर :काही दिवसांपूर्वी भिवापूरमधील पेट्रोल पंपमालकाची हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मुलीनेच वडिलांची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडिलांचे बाहेर तीन ते चार महिलांशी अनैतिक संबंध तसेच घरी आई व बहिणीला मारहाण करीत शारीरीक व मानसिक त्रास देत असल्याचे मुलीने ५ लाखांची सुपारी देऊन त्यांची हत्या करण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्याकांडात मुख्य आरोपी म्हणून मुलीला अटक केली आहे. प्रिया किशोर माहुरतळे-सोनटक्के असे आरोपी मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीवापूरमधील पाटील पेट्रोल पंपवर दिलीप राजेश्वर सोनटक्के (५०, दिघोरी) यांचा दुचाकीने आलेल्या तीन आरोपींनी चाकू भोसकून खून केला. त्यानंतर १ लाख ३४ हजार रुपये चोरून त्याठिकाणाहून पळ काढला. दिलीप सोनटक्के यांचे बाहेर तीन ते चार महिलांशी अनैतिक संबंध होते. त्याच्या एका प्रेयसीने पेट्रोल पंप नावावर करून देण्यासाठी दिलीप यांच्यावर दबाव टाकला होता.
त्यामुळे ते पत्नीच्या नावे असलेला पेट्रोल पंपही नावे करून देण्यासाठी पत्नीला मारहाण करीत होता. तसेच मुलगी प्रिया आणि तिची घटस्फोटीत बहिण या दोघींनाही मारहाण करीत अश्लील शिवीगाळ करीत होता. या त्रासाला कंटाळून मोठी मुलगी प्रिया हिने वडिलांचा खून करण्याची सुपारी शेख अफरोज याला दिली. तिने वडिलांना खून करण्यासाठी ५ लाख रुपयांत सुपारी दिली होती. कटानुसार लुटमार करण्याच्या उद्देशाने पेट्रोल पंपवर गेलेल्या अफरोज आणि त्याच्या तीन साथिदारांनी दिलीप यांचा खून केला.