नागपूर : राज्यात उन्हाळा सुरु असताना पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उद्भवले आहे. विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नागपुरातही मागील दोन दिवस पाऊस पडला असून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. वातावरणातील वाऱ्याची खंडितता या प्रणालीमुळे सध्या राज्यात ठिकठिकाणी गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस होत आहे.
विदर्भासाठी पुढील पाच दिवस धोक्याचे असून पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांवर होणार आहे.राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात आगामी पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहणार असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
नागपूर शहरात झालेल्या हवामान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे.