Advertisement
नागपूर: हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत गुरुवारी शहराच्या बहुतेक सर्वच भागांत पहाटेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाने बरसत चांगलेच धुऊन काढले. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. हवामान विभागाने नागपूर विभागात यलो अलर्ट दिला आहे.
शहारात पावसानंतर गारवा निर्माण झाल्याने उकाडा सोसणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शहरात वादळ वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. सकाळपासूनच नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
काही भागात रिपरिप तर काही भागात मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाने आधीच विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहिसा दिलासा मिळाला आहे.
परिसरात तापमानातही घट झाली आहे. आणखी पुढील तीन दिवस देखील पावसाचा अंदाज आहे.