Published On : Sat, Oct 9th, 2021
By Nagpur Today Nagpur News

जयभीम चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

नागपूर महानगरपालिकेच्या ३५ लक्ष रुपये निधीमधून सौंदर्यीकरण

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग ६ मधील जयभीम चौक यादव नगर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि सौंदर्यीकरण कार्याचे शुक्रवारी (ता.८) उपमहापौर मनीषा धावडे, भन्ते आर्य नागार्जून सुरेई ससाई व मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. स्थानिक नगरसेवक बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांच्या विशेष पाठपुराव्यातून हे कार्य पूर्णत्वास आले.

Gold Rate
Tuesday 04 March 2025
Gold 24 KT 86,100 /-
Gold 22 KT 80,100/-
Silver / Kg 95,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लोकार्पण सोहळ्याला उपमहापौर मनीषा धावडे यांच्यासह मनपाचे स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, भन्ते आर्य नागार्जून सुरेई ससाई, महाथेरो भदन्त ज्ञानज्योती, भदन्त ज्ञानबोधी, भदन्त महेंद्ररत्न, बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार, आशीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, नगरसेविका वैशाली नारनवरे, नगरसेवक इब्राहिम तौफीक अहमद, नगरसेवक सर्वश्री मनोज सांगोळे, दिनेश यादव, परसराम मानवटकर, नगरसेविका मंगला लांजेवार, भावना लोणारे, स्नेहा निकोसे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, सहायक आयुक्त अभिजीत बावीस्कर, आयोजन समितीचे अध्यक्ष धर्मपाल वंजारी, सचिव बुद्धिवान सुखदेवे, उपाध्यक्ष प्रसन्नजीत गजभिये आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमहापौर मनीषा धावडे म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे समस्त भारतीयांचे आदर्श आहेत. आज त्यांनी देशाला बहाल केलेल्या संविधानानुसार देश मार्गक्रमण करीत आहेत. संविधानाने महिला, पुरूष सर्वांनाच संधीच्या समान संधी दिल्या. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य हे सदैव प्रेरणादायी आहेत. त्यांचे स्मारक, पुतळे हे त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेउन त्यानुसार मार्गक्रमण करण्याची शिकवण देतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयभीम चौकातील सौंदर्यीकृत पुतळ्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे, असेही त्या म्हणाल्या. अनेक वर्षापासून प्रलंबित विषयाला पूर्णत्वास नेउन ते प्रत्यक्षात साकारण्यात महत्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल उपमहापौरांनी बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांचे अभिनंदन केले.

विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरण कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, गत पाच वर्षामध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे एकमेव पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तो पुतळा संविधाननिर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा असणे ही प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. बाबासाहेबांनी दीक्षा घेउन नागपूर शहराला ऐतिहासिक महत्व बहाल केले. बाबासाहेब नसते तर देशाची घटना निर्माण झाली नसती आणि घटनेअभावी आजही चाकोरीबद्ध जीवन व्यतित करणे हेच भाग्यात असते. त्यामुळे बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयाला संविधानाच्या रुपात अमूल्य भेट दिली आहे. त्याचा योग्य वापर व्हावा, असेही ते म्हणाले. अनेक वर्षांपासून लोकार्पणापासून वंचित राहिलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न प्राधान्याने सोडविल्याबद्दल त्यांनीही जितेंद्र घोडेस्वार यांचे अभिनंदन केले.

यादवनगर येथील जयभीम चौकामध्ये मागील ३५ ते ४० वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलेला होता. या पुतळा व येथील परिसर जीर्णावस्थेत आल्याने येथील नूतनीकरणासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र प्रशासकीय अडथळ्यांमुळे ते पूर्ण होउ शकले नाही. यासंबंधी अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला. मनपाद्वारे या कार्यासाठी ३५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून हे कार्य साध्य होउ शकले. या कार्यामध्ये जयभीम चौक विकास समितीचे महत्वाचे योगदान असल्याचे प्रास्ताविकात बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी सांगितले. दिवंगत रवी वंजारी यांच्या परिवाराद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सदर ठिकाणी अनावरण करण्यासाठी भेट देण्यात आला. त्याबद्दल जितेंद्र घोडेस्वार यांनी वंजारी कुटुंबियांचे आभार मानले.

जयभीम चौकातील कार्य पूर्णत्वास नेउन त्याचे लोकार्पण कार्य करण्यात आल्याबद्दल जयभीम चौक विकास समिती व अन्य संघटनांच्या वतीने जितेंद्र घोडेस्वार यांचा उपमहापौर मनीषा धावडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अजय पात्रे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयभीम चौक ज्येष्ठ नागरिक मंचचे वामन उके, सुनील थोरात, जयभीम चौक ऑटो चालक मालक संघटनेचे अनिल सांगोळे, संजय नागदेवे, जयभीम चौक विकास समितीचे राजकुमार तांडेकर, विलास कांबळे, कमला बोरकर, बोधीवृक्ष बौद्ध विहार समितीचे नितीन सोमकुवर, मयूर मेश्राम, बहुजन हिताय बौद्ध विहार समिती उत्तम चहांदे, यशवंत भिवगडे, संघमित्रा बौद्ध विहार समितीचे प्रतिक वंजारी, दीपक सोमकुवर, आम्रपाली बौद्ध विहार समिती, तथागत बौद्ध विहार, भिमाई बौद्ध विहार, जयभीम चौक व्यापारी संघटना, त्रिरत्न बौद्ध महासंघ, नवनिर्माण डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, सारीपुत्र बौद्ध विहार, मुचलिंद बौद्ध विहार, आदर्श बौद्ध विहार, सम्राट अशोक ध्यान केंद्र, भारतीय बौद्ध महासभा, युवा भीम मैत्रीय संघ, तथागत सत्कार समिती, सुजाता नगर बौद्ध विहार आदींनी सहकार्य केले.

Advertisement