अवध चेंबर ऑफ कॉमर्सशी ई संवाद
नागपूर: कोरोनासारख्या संकटाच्या काळात देशात रोजगार निर्माण करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान, देशातील उत्पादनांची निर्यात आणि परकीय गुंतवणूक जर उद्योगांमध्ये आणली तर रोजगार निर्माण होऊ शकतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
अवध चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्यांशी गडकरींनी आज त्यांच्या निवासस्थानाहून ई संवाद साधला. शुगर मिलच्या माध्यमातूनही रोजगार निर्मिती होऊ शकते असे सांगताना ते म्हणाले- साखर कारखान्यांमधून साखरेऐवजी ‘शुगर सिरप’ बनवावे व त्यापासून इथेनॉल बनविले जावे. साखर कारखान्यांची अर्थव्यवस्था 20 हजार कोटींवरून 1 लाख कोटीपर्यंत जाईल व रोजगारही वाढतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपल्या देशात गहू तांदूळ 3 वर्षापेक्षा अधिक पुरतील एवढा साठा आहे. एक टन तांदळापासून 400 लिटर इथेनॉल निर्माण होते. गहू आणि तांदूळ सडून वाया गेल्यापेक्षा त्यापासून इथेनॉल निर्माण झाले तर अर्थव्यवस्था आणखी सक्षम होईल. पीक पध्दती बदलण्याची गरज असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले- 90 हजार कोटींचे खाद्य तेल आपण आयात करतो. आता तेलबियांचे उत्पन्न अधिक घेतले तर ही आयात कमी होईल. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये सोयीबीन एकरी 30 आणि 24 क्विंटल उत्पन्न होते. तेच भारतात 4 ते 5 क्विंटल उत्पादन होते. हे उत्पादन वाढविण्याची गरज आहे.
उत्तरप्रदेशातील सहानपूर येथे फर्निचरचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. येथे फर्निचर क्लस्टर तयार करून जागतिक दर्जाचे फर्निचर तयार करण्याची योजना तयार केली पाहिजे. तसेच लेदर उद्योग- आग्रा येथे मोठ्या प्रमाणात लेदर उद्योग चालतो. पण तो घरच्या घरीच चालतो. लेदर क्लस्टर करून या छोट्या उद्योजकांना जागा व अन्य सुविधा मिळाल्या तर हा उद्योगही अर्थव्यवस्थेत मोठी भर घालू शकतो, असेही ते म्हणाले.
एमएसएमईची व्याख्या आम्ही बदलली आहे. आधी उत्पादन निर्मिती आणि सेवा हे दोन क्षेत्र वेगवेगळे होते. आम्ही ते आता एकत्र केले आहे. तसेच सहकारी बँका, खाजगी बँका, राष्ट्रीय बँका आता एमएसएमईच्या योजनांसाठी कर्ज वाटप करू शकतील. एनबीएसएफही कर्ज देईल. पण या संस्थेने परकीय भागभांडवल अधिक मिळवले पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे. परकीय भागभांडवल जर आले तर रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होणार आहेत. सर्वसामान्य माणसापासून तर उद्योग, शासन सर्वच जण कोरोनामुळे अडचणींचा सामना करीत आहेत.
पण यातूनही मार्ग काढून आपल्याला अर्थव्यवस्था बळकट करायची आहे. हँडलूम, मधाची निर्मिती, खादी ग्रामोद्योग अशा लहान उद्योगांमध्ये ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. संकटाच्या काळातही सकारात्मक विचाराने व आत्मविश्वासाने संघर्ष केल्यास आपण सर्व जण यातून सुखरूप बाहेर पडू असेही गडकरी म्हणाले.