मनपा मुख्यालयात विदर्भातील मनपा आयुक्तांची बैठक
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या माननीय प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी यांनी मंगळवारी (१३ सप्टेंबर) केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत विविध कल्याणकारी योजनांचा आढावा नागपूर महानगरपालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेतला.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी., नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. मनोज कुमार सूर्यवंशी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे, नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, अकोला महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती कविता द्विवेदी, अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश मोहिते, नगर विकास विभागाच्या उपसचिव विद्या हम्पय्या, उपसचिव श्री. श्रीकांत अंडगे, नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी पुष्पगुच्छ आणि मनपाचा मानाचा दुपट्टा देऊन श्रीमती सोनिया सेठी प्रधान सचिव नगरविकास विभाग यांचे स्वागत केले.
मा.प्रधान सचिवांनी महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या अमृत योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शहर सौंदर्यीकरण योजना, आझादी का अमृत महोत्सव इत्यादी महत्वाच्या योजनेची अंमलबजावणी व प्रगतीबाबत आढावा घेतला. सदर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शहराच्या विकासात भर पडणार असून नागरिकांचे जीवनमाण उंचवण्यास मदत होणार असल्याने यंत्रणांनी यात पारदर्शीपणे व वेगाने काम करणे आवश्यक असल्याचे निर्देश दिलेत. तसेच नागपूर स्मार्ट सिटीच्या व नागपूर सुधार प्रन्यास मार्फत राबविल्या जाणा-या योजना व कामाच्या प्रगतीबाबत सद्यस्थिती जाणून घेतली.
त्यांनी सेवा पंधरवाडा अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत प्रभाविपणे राबविण्याचे निर्देश दिले. तसेच महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीबद्दल उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत शोधण्यावर विशेष भर देण्याचेही निर्देश दिले. नागरी मुलभूत सेवा प्राप्त करणे नागरिकांना सहज शक्य व्हावे यासाठी मनपातर्फे डिजिटल सेवेवर भर देण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले. शहर सौंदर्यीकरण या विषयास प्राधान्य देवून यासाठी तज्ञांची मदत घेवून शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतीक वारसा जपणे तसेच योग्य सौंदर्यीकरण करणे हेतू सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
त्यांनी नागपूर मनपाच्या ‘टॅक्स मॉनिटरिंग ॲपबद्दल माहिती घेतली आणि राज्यात इतर ठिकाणी सुद्धा त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा मानस व्यक्त केला. या ॲपला राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार सुध्दा प्राप्त झाला आहे.
श्रीमती सोनिया सेठी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या प्रलंबित निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले व शहराचे विकासासाठी नगरविकास विभागामार्फत संपूर्ण सहकार्य व तातडीची मदत करण्याबाबत आश्वस्त केले.