मुंबई: आज जाहीर झालेल्या लातूर, परभणी आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये व्ही. व्ही. पी. ए. टी. मशीनचा वापर करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज लातूर, परभणी व चंद्रपूर या महानगरपालिकेच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. काल मंगळवार दि. 21 मार्च 2017 रोजी आपण व्ही. व्ही. पी. ए.टी मशीन वापरासंदर्भात राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती.
नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये ई. व्ही. एम. मशीनच्या गैरवापराबद्दल राज्यातील वेगवेगळ्या भागातून तक्रारी आलेल्या असून त्यासंदर्भात राज्यभरात आंदोलनेही झाली आहेत. मोठ्या प्रमाणावर इलेक्शन पीटीशन्स देखील कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत.
लोकशाहीमध्ये पारदर्शक निवडणूका पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. त्यामुळे आपण या निवडणुकीपासूनच व्ही. व्ही. पी. ए. टी मशीनचा वापर सुरु करावा असे अॅड. गणेश पाटील म्हणाले.