Published On : Sat, Apr 28th, 2018

उत्तर प्रदेशात १ मे रोजी साजरा होणार महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा

मुंबई: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे राजभवनात 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

यावर्षी लखनौ मध्ये होणारा महाराष्ट्र दिवस सोहळा उत्तर प्रदेश सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र समाज लखनौ, मराठी समाज उत्तर प्रदेश आणि भातखंडे संगीत विश्वविद्यालयाच्या वतीने 1 आणि 2 मे रोजी राजभवनातच आयोजित करण्यात आला आहे. 1 मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुख्य अतिथी असतील, तर उत्तर प्रदेशाच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति दिलीप बाबासाहेब भोसले आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे विशेष अतिथी असतील. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा आणि सूचना मंत्री डॉ. नीळकंठ तिवारी हेही उपस्थित राहतील. 2 मे रोजी समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य तसेच मंत्री मंडळातील ज्येष्ठ मंत्री डॉ. रीता बहुगुणा जोशी, लक्ष्मी नारायण चौधरी, आशुतोष टंडन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील, असेही राज्यपाल श्री.नाईक यांनी सांगितले.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

समारोहातील सांस्कृतिक कार्यक्रमाची व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली असून पहिल्या दिवशी‘भूपाळी ते भैरवी’ या संघातर्फे महाराष्ट्रातील 16 लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये भूपाळी, ओवी, आदिवासी नृत्य, कोळी नृत्य, छत्रपति शिवाजी महाराजांची आग्राहून सुटका यावर आधारित नाट्यनृत्य तर अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच लोकमान्य टिळकांची भूमिका असलेला गणेशोत्सव आदी विविध प्रकारचे 16 लोककला प्रकार सादर करण्यात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 मे रोजी ‘नाट्यसंगीताची वाटचाल’ हा श्री अरविंद पिळगावकर आणि अन्य कलाकारांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही 1 आणि 2 मे 2017 रोजी लखनौ मधील मराठी संस्थांच्यावतीने राजभवनातच महाराष्ट्र दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांनी मराठीचे वाल्मिकी ग.दि.माडगुळकर यांच्या गीत रामायणाचा कार्यक्रम प्रस्तुत केला होता, अशी माहितीही राज्यपाल श्री.नाईक यांनी दिली.

राज्यपाल श्री. नाईक यांनी सांगितले की, गेल्या वर्षी 30 डिसेंबर 2017 रोजी एक अभिनव कार्यक्रम करण्यात आला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ हा लोकमान्य टिळकांचा अमर उद्घोष लखनौ मध्ये 1916 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनातील भाषणाचा भाग होता. 2017 मध्ये त्या काँग्रेस अधिवेशनाची शताब्दी होती. या निमित्ताने १०१ वर्ष झाल्याचे निमित्ताने या घटनेचा शानदार सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 डिसेंबर 2017 रोजी लखनौ येथे पार पडला. त्याच कार्यक्रमात महाराष्ट्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यामध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्याचा सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. त्या सामंजस्य कराराचा भाग म्हणूनच येत्या 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र दिन सोहळा राजधानी लखनौ येथे साजरा करण्यात येणार आहे, असेही राज्यपाल श्री.नाईक यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचं एक अतूट नाते आहे. प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात नाशिकच्या पंचवटीत राहिले. छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीच्या गागाभट्टांनी केला. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा सक्रिय सहभाग होता. उत्तर प्रदेशातील आद्य पत्रकार म्हणून ‘दैनिक आज’चे संपादक बाबूराव विष्णू पराडकर यांनी पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्याचबरोबर महाराष्ट्रात जन्मलेले पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं. विष्णू नारायण भातखंडे यांनी शास्त्रीय संगीतात उत्तर प्रदेशमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. लखनौमध्ये भातखंडे संगीत विश्वविद्यालय हे देशातील एकमात्र संगीत विश्वविद्यालय आहे. त्या विश्वविद्यालयात भारतातील आणि परदेशातीलही अनेक लोक शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यासाठी येत असतात.

उत्तर प्रदेशात लखनौ, कानपूर, आग्रा, वाराणसी, बरेली आदी महत्त्वाच्या शहरात मराठी भाषिकांच्या संघटना आहेत. त्यांच्यामार्फत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात मी जेव्हा जातो तेव्हा मला मी मुंबईत असल्याचीच जाणीव होत असते. अनेक शहरांमध्ये मराठी भाषिकांच्या तीन-तीन चार-चार पिढ्या उत्तर प्रदेशात झाल्या आहेत. उत्तर प्रदेशाच्या सामाजिक जीवनामध्ये ते पूर्णतः मिसळून गेले आहेत. परंतु त्यांचा मराठी बाणाही जागृत आहे, याचा अनुभव मी गेले साडेतीन वर्षे घेत आहे. त्याचाच आनंद लखनौमध्ये 1 आणि 2 मे रोजी उत्तर प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्यावतीने होणाऱ्या समारोहात मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचे संबंध अधिक स्नेहाचे होतील, असा विश्वास राज्यपाल श्री.नाईक यांनी व्यक्त केला.

Advertisement