नागपूर : नागपूर शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी आज रविवारी २ मे रोजी मनपाच्या दहा झोनमधील दहा केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण मनपाद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहिल, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
तसेच राज्य शासनाद्वारे ४५ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी मनपाला ११५० लस प्राप्त झालेल्या आहेत. नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना रविवारी (ता.२) झोन मधील निर्धारित लसीकरण केंद्रावर लस दिली जाईल. सोमलवाडा, के.टी. नगर, मानेवाडा, बाबूलखेडा, ताजबाग, हंसापुरी सतरंजीपुरा, पारडी, कपील नगर आणि झिंगाबाई टाकळी या १० केंद्रांवर लस उपलब्ध राहिल. लस कमी उपलब्ध झाल्यामुळे मनपाद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
प्रत्येक केंद्राला १०० लस प्रदान करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय एम्स ला १५ लस सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त १० लसीकरण केंद्रांव्यतिरिक स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र येथे सुध्दा ४५ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू राहिल तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे कॉव्हॅक्सिन चा दुसरा डोज देणे सुरू राहिल, असेही अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.