नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आपापले अर्ज दाखल करत आहेत. नागपुरातही अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरु आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येत आहेवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनीस अहमद उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्याधिकारी कार्यालयात निर्धारित वेळेनंतर पोहोचल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही.
काँग्रेसचे माजी मंत्री व अ.भा. काँग्रेसचे सचिव अनिस अहमद यांनी सोमवारी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. आज ते वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. अहमद यांनी मध्य नागपुरातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती; पण गेल्यावेळी फक्त चार हजाराने पराभूत झालेले अ. भा. युवक काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. त्यामुळे अहमद नाराज झाले. काँग्रेसने पूर्व विदर्भात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही.
मुस्लिमांनी फक्त काँग्रेसला मतेच द्यायची का, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर सोमवारी त्यांनी मुंबई येथे राजगृहावर जाऊन वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला.