नागपूर: नागपूर महानगरपालिका आसीनगर झोनच्या नवनिर्वाचित सभापती वंदना चांदेकर यांनी बसपा आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारला.
यावेळी मनपातील विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, बसपाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे, उपाध्यक्ष कृष्णराव बेले, पृथ्वीराज शेंडे, महासचिव जितेंद्र म्हैसकर, प्रदेश सचिव नागोराव जयकर, भाऊराव गोंडाणे, जिल्हाप्रमुख विलास सोमकुंवर, बसपाचे मनपातील गटनेते मोहम्मद जमाल, मावळत्या सभापती भाग्यश्री कानतोडे तसेच बसपा, काँग्रेस व भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे म्हणाले, बसपा हा समाजातील सर्वच घटकांना समान न्याय देणारा पक्ष आहे. सभापती पदाच्या माध्यमातून सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न नवनिर्वाचित सभापती वंदना चांदेकर करतील, असा आपणास विश्वास आहे. त्यांनी पक्षभेद विसरून सर्वांच्या समस्या सोडवाव्यात. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी कार्य करावे. आपल्या कार्यातून त्या झोनचा नावलौकिक करतील, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे म्हणाले, परिवर्तन ही काळाची गरज आहे. आसीनगर झोनमध्ये सभापतींच्या रूपाने झालेले परिवर्तन म्हणजे विकासाच्या दृष्टीने पडलेले पाऊल आहे. नव्या सभापती पक्षभेद विसरून झोनमधील जनतेची कामे नि:स्वार्थपणे करतील, झोनच्या विकासाला नवा आयाम देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनपातील बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी प्रास्ताविकातून बसपा नगरसेवकांच्या माध्यमातून होत असलेल्या परिवर्तनाची माहिती दिली. आसीनगर झोनमध्ये बसपाचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने सभापतीपदावर खरा हक्क बसपाचा होता. त्यानुसार येथे बसपाचे सभापती निवडून आले. आता सभापतींच्या माध्यमातून सर्व नगरसेवक एकजूट होऊन झोनविकासाला प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी दिला.
बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णाजी बेले, मावळत्या सभापती भाग्यश्री कानतोडे आणि बसपाच्या अन्य पदाधिकाऱ्यांचीही यावेळी भाषणे झालीत. नवनिर्वाचित सभापती वंदना चांदेकर म्हणाल्या, पक्षाने माझ्या खांद्यावर सभापतीपदाची धुरा टाकून जो विश्वास व्यक्त केला, त्या विश्वासाला मी सार्थ ठरवीन. मी झोनची सभापती असल्याने सर्वच पक्षाचे नगरसेवक माझ्यासाठी समान आहेत. नगरसेवकांनी मांडलेले प्रश्न हे नागरिकांचे प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला आपण प्राधान्य देऊ, असेही त्या म्हणाल्या. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आसीनगर झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. सत्कार कार्यक्रमानंतर नवनिर्वाचित सभापती वंदना चांदेकर यांनी मावळत्या सभापती भाग्यश्री कानतोडे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
कार्यक्रमाला नगरसेविका मंगला लांजेवार, वैशाली नारनवरे, विरंका भिवगडे, नगरसेवक संजय बुर्रेवार, परसराम मानवटकर, ईब्राहीम टेलर, दिनेश यादव, नितीन साठवणे, बसपाचे शहर अध्यक्ष प्रकाश गजभिये, गणेश कानतोडे, महेश सहारे, योगेश लांजेवार, राजू चांदेकर, मुरली मेश्राम, माजी नगरसेवक दीपक जांभूळकर व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.