नागपूर: उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांचे शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय इवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन होणार आहे. उपराष्ट्रपती यांच्या हस्ते दुपारी 4 वाजता रेशीमबाग मैदानावर आयोजित 9 व्या अग्रोव्हीजन कार्यशाळा तसेच राष्ट्रीय प्रदर्शन आणि कॉन्फरन्सचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभानंतर सायंकाळी 6.45 वाजता विशेष विमानाने भूवनेश्वरकडे प्रयाण करतील.
जिल्हाधिकाऱ्यांकडून व्यवस्थेचा आढावा
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांच्या शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजीच्या दौऱ्या संदर्भात करावयाच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. उपराष्ट्रपती यांचे आगमन तसेच रेशीमबाग येथील अग्रोव्हीजन प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रम या संदर्भात आयोजन समिती तसेच पोलीस, महसूल, विमानतळ प्राधिकरण, मिहान, आरोग्य, अन्न व औषधीद्रव्य, तसेच माहिती व जनसंपर्क विभागाकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, स्वागत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक हेमंत निंबाळकर, अग्रोव्हीजनचे रमेश मानकर, एअर इंडियाचे वसंत घोरडे, उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, रविंद्र खजांजी, राजभवनचे वरिष्ठ अधिकारी रमेश येवले आदी उपस्थित होते.