नागपूर : राज्यात ऊन्हाचा तीव्र कहर वाढत असताना, विदर्भात तापमान 44 अंशांवर पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. न्यायालयाने विदर्भातील सर्व शाळांना परीक्षांचे वेळापत्रक तातडीने बदलण्याचे निर्देश दिले असून, शिक्षण विभागाची परवानगी घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे.
शालेय शिक्षण विभागाने यंदा राज्यभर एकाच दिवशी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे विदर्भातील परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबल्या आहेत. मात्र, विदर्भातील वाढत्या तापमानामुळे स्थानिक शाळा, शिक्षक संघटना व पालकांनी जोरदार विरोध दर्शवला होता. परिणामी, न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती.
काल संध्याकाळी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राधान्य देत हा निर्णय दिला. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने देखील या निर्णयाचे स्वागत करत शिक्षण अधिकाऱ्यांनी 15 एप्रिलपूर्वी परीक्षा पूर्ण करण्यासाठी तातडीने सुधारित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.
पहिली ते नववीच्या परीक्षा आजपासून सुरू-
दरम्यान, राज्यभरातील पहिली ते नववीच्या परीक्षा आजपासून (8 एप्रिल) सुरू होत असून, एकूण 1 कोटी 45 लाख विद्यार्थी या परीक्षांमध्ये सहभागी होत आहेत. या परीक्षा 25 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. यंदा प्रथमच नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नियतकालिक मूल्यमापन चाचणी’ (PAT) लागू करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने हे वेळापत्रक राज्यस्तरावरून निश्चित केल्यामुळे काही शिक्षक संघटनांनी याला विरोध दर्शवला आहे. मात्र प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून परीक्षा वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.