नागपूर:विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर आला आहे.सर्व्हेत विदर्भात महायुतीला फक्त 25 जागा मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
विधानसभेत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता –
विधानसभेत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता सर्व्हेच्या आकड्यांवरून दिसून येते.महाविकास आघाडी सरकार उलथवून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. अजितदादांच्या सरकारमध्ये सामिल होण्याच्या निर्णयाने महायुतीची समीकरणे पूर्णपणे बदलून गेले आहेत. जिथे वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात उमेदवार लढले, त्यांच्याशीच हातमिळवणी करण्याची वेळ काही नेत्यांवर आली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील काही नेते या युतीवर नाराज आहे. तत्पूर्वी विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारसंबंधी जनतेचे मत काय आहे? आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेची पसंती कुणाला आहे, असा सर्व्हे भाजपच्या वतीने विदर्भात केला गेला असून त्यातून धक्कादायक आकडे समोर आल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
विदर्भात भाजपला 18 जागा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळत असल्याची माहिती आहे. तर नागपूर जिल्ह्यात भाजपाला फक्त 4 जागा मिळत असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. सध्या महायुतीकडे विदर्भातूल 62 पैकी 39 आमदार आहेत. तर नागपूर जिल्ह्यात 12 पैकी भाजपाला फक्त 4 जागा मिळत असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. 2019 मध्ये 7 आमदार भाजप महायुतीकडे होते. भारतीय जनता पक्षाला विदर्भात 62 पैकी 2014 मध्ये 42 व 2019 मध्ये 29 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2019 मध्ये 5 आमदार निवडून आले होते. त्यात चार जागा अजित पवार यांच्याकडे होत्या, तर शिवसेनेकडे 2019 मध्ये 3 जागा होत्या. तर 3 अपक्षांची शिवसेना शिंदे गटाला साथ होती. त्यामुळं विदर्भात शिंदे शिवसेनेकडे 6 आमदार आहेत.
राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच –
या मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सूरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत महायुतीच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर वादातीत मतदारसंघांबाबत बैठक घेऊन विषय सोडवावा, अशा सूचना अमित शाहा यांनी दिल्या आहेत. याच आठवड्यात राज्यातील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन वादातीत मतदारसंघाबाबतचा निर्णय सामोचाराने सोडवण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.