नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा आणि शिवसेनेचा विरोध असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी विदर्भ हा योग्य पर्याय असू शकतो. असं मत काटोल विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी आज व्यक्त केले. आज देशमुख यांनी विधानसभेत एक निवेदन सादर करून अशा प्रकारचे प्रकल्प विदर्भात आणावे जेणेकरून विदर्भाचा विकास होईल अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
याबाबत अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले की, विदर्भ हा आर्थिक विकासाच्या बाबतीत मागे पडलेला आहे. त्यामुळे जर तेल शुद्धीकरणासारखे प्रकल्प विदर्भात आणल्या गेले तर विदर्भातील बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. यासाठी मी आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांना याबाबत मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले. याबाबत मी स्वतः केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विदर्भात अशा प्रकारचे तेल शुद्धीकरण प्रकल्प आणावे यासाठी मागणी करणार आहोत तसेच वेळ पडल्यास मी आणि धर्मेंद्र प्रधान आम्ही दोघेही पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
अशा प्रकारचे प्रकल्प विदर्भात आले तर विदर्भातील जवळपास पन्नास हजार युवकांना प्रत्यक्ष आणि एक लाख युवकांना अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच विदर्भात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, यापूर्वी नाना प्रकल्पाला स्थानिकांचा होत असलेला विरोध सरकारने लक्षात घेता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. भेटीत देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत नाणार प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी केली होती.