Published On : Mon, Apr 23rd, 2018

विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे निर्देश

Advertisement

मुंबई: राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून या मंडळांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे दिले.

राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ यांची संयुक्त बैठक राजभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, मुख्य सचिव सुमित मल्लिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांच्यासह विकास मंडळांचे अध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यपाल यावेळी म्हणाले, विकास मंडळांनी कार्यक्षमता वाढवून कालबद्ध पद्धतीने या तीनही विभागांचा अधिक विकास होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. काही भागात अनुशेष दूर करण्यासाठी निधीचे समान वाटपाचे जे सूत्र आहे, ते बदलण्याची गरज असून विभागनिहाय निधी वाटपासाठी आवश्यक त्या सुधारणा नियोजन विभागाने येत्या तीन महिन्यांत कराव्यात. विकास मंडळांना मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी रिक्त जागा भरण्यासाठी नियोजन विभागाने प्रक्रिया हाती घ्यावी.

तीनही विकास मंडळांनी केंद्र व राज्य शासनाचे जे महत्वाकांक्षी प्रकल्प, योजना आहेत ते राबविण्यासाठी अधिक भर दिला पाहिजे. आदिवासी भागातील मुले शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सादरीकरणादरम्यान जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हाती घेतलेल्या ‘मी लोणारकर’ मोहिमेविषयी सांगितले. त्याचा राज्यपालांनी आपल्या भाषणात विशेष उल्लेख करुन या उपक्रमाचे कौतुक केले. अधिक प्रभावीपणे हा उपक्रम राबविण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, विदर्भ, मराठवाडा भागातील सिंचन, आरोग्य, शिक्षण, कृषी या क्षेत्रातील विकासासाठी तीनही विकास मंडळांनी विशेष लक्ष केंद्रित करुन काम करण्याची गरज आहे. तीनही विकास मंडळांनी केलेल्या सूचनांच्या अभ्यास आणि समन्वयासाठी एक समिती असणे आवश्यक आहे. गडचिरोली भागातील मलेरियाचा प्रादुर्भाव आणि आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आणि त्याच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विदर्भ, मराठवाड्यातील कृषिपंपांना वीज जोडणी मिळण्यासाठी प्रयत्न करावे. त्याचबरोबर माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करुन त्या माध्यमातून नागपूर विभागात सिंचनाची क्षमता वाढवावी.

यावेळी नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी विदर्भ विकास मंडळाचे, औरंगाबाद विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाडा विकास मंडळाचे तर कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे सादरीकरण केले. यावेळी मंडळाचे सदस्य डॉ. आनंद बंग, कपिल चंद्रयान, शंकर नागरे यांनी आरोग्य, शिक्षण, सिंचन याबाबत केलेल्या सविस्तर अभ्यासाचे सादरीकरण केले.
बैठकीस राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र जलसंपदा प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे सदस्य सचिव ई. रविंद्रन यांच्यासह विकास मंडळांचे सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Advertisement