महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या अनोख्या शैलीने विरोधी पक्षांवर टीका करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांचं एक आगळं वेगळं रुप लोकांना पहायला मिळालं. निमीत्त होतं एन्वार्यमेंट फोरम ऑफ इंडिया तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मातीतल्या खेळांची जत्रा या उपक्रमाचं. बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला आज अजित पवार यांनी सपत्नीक हजेरी लावली. या महोत्सवात विटीदांडू, गोट्या, लगोरी, टायर पळवणे यासारखे खेळ खेळले जाणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान देऊन अजितदादांनी विटादांडू खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना कार्यकर्त्यांनीही चांगलीच दाद दिली. दरम्यान अजित दादांच्या या विटीदांडूची चर्चा दिवसभर राजकीय क्षेत्रात होत होती. याचसोबत सोशल मीडियावरही अजित पवारांच्या या व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळाला.