नागपूर – लकडगंज येथील क्वेटा कॉलनीच्या प्रवेशद्वारासमोर ‘डॉन’ नावाच्या तरुणाचा अज्ञात आरोपीने दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. लकडगंज पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या प्रकरणातील आरोपी फरार आहे. डॉन उर्फ राजेंद्र असे मृताचे नाव असून त्याला दारू पिण्याचे व्यसन होते.
शहरातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या होणार आहे. यापार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही लकडगंज येथील चौकाजवळ घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉन उर्फ राजेंद्र (40) नेहमी दारू पेऊन कॉलनीत फिरत असे. घटनेच्या दिवशी तो क्वेटा कॉलनी बसस्थानकासमोरील रोड डिव्हायडरवर झोपला होता. सुमारे 30-35 वर्षांच्या अज्ञात आरोपीने त्याची दगडाने ठेचून हत्या केली व मृतदेह चादरने झाकून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळी पोलिस उपायुक्त मेहक स्वामीही पोहोचल्या होत्या.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक आरोपी डॉनला दगडाने ठेचून मारताना दिसत आहे. पोलिसांना आरोपीचे फोटो सापडले आहेत. त्याआधारे त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपी आणि मृतकामध्ये काही वाद झाल्याने आरोपीने डॉनचा खून करून तेथून पळ काढल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेमागचे रहस्य काय आहे, हे आरोपी पकडल्यानंतरच समोर येईल. पोलिसांनी सध्या खुनाचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.