नागपूर : एकीकडे शहरात सोमवारी सर्वत्र होळीचा उत्साह साजरा करण्यात येत असताना पाचपावली पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मद्यधुंद कार चालकाने दुचाकीला धडक दिल्याने बहीण-भाऊ थेट पुलावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाले. मोहम्मद इरफान अन्सारी (३१) आणि त्यांची बहीण फौजिया फहाद अन्सारी (२१) अशी अपघातग्रस्त बहीण-भाऊचे नावे आहेत.
सोमवारी ते मोमीनपुरा येथील टेका नाका येथील त्यांच्या राहत्या घरी जात असताना हा भीषण अपघात झाला. त्यानंतर पुलावरून अंदाजे 40 फूट खाली रस्त्यावर कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील कार चालकाला प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
या अपघातानंतर मुस्लिम बांधवानी पाचपावली पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन करत चालकाच्या विरोधात कठोर कारवाईची जोरदार मागणी केली.
उल्लेखनीय म्हणजे, फेब्रुवारीमध्ये नागपुरातील राम झुला येथे झालेल्या भीषण अपघातात मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (३४) आणि मोहम्मद अतीफ (३२) या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. मर्सिडीज कार चालक महिलेने मद्यधुंद अवस्थेत या दोन तरुणांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने संपूर्ण नागपुरात खळबळ उडाली होती, मात्र तपासात जवळपास कोणतीही प्रगती झालेली नाही, अशी मागणी पीडितांचे कुटुंबीय आणि जनता फाउंडेशनचे अध्यक्ष काझी झिशान सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत केली. ही घटना ताजी असतानाच आता दुसरा अशाच प्रकारचा अपघात झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.