नागपूर :नागपूर महापालिकेची मुदत संपल्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून मनपाची सूत्रे प्रशासक आयुक्तांकडे देण्यात आली आहे. प्रशासकपदाची जबाबदारी आयुक्तांकडेच देण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. मात्र सध्या नागपूर शहराची दुर्दशा झाली असून याला केवळ महानगरपालिकेतील प्रशासक व्यवस्थाच जबाबदार असल्याची टीका माजी जलप्रदाय सभापती आणि माजी नगरसेवक संदीप गवई यांनी ‘नागपूर टुडे’ शी बोलतांना केली.
कोणत्याही नगरसेवकाचा प्रभाव पडत नसल्याने नागपूर मनपा प्रशासनाने मनमानी कारभार सुरू केला आहे. एकीकडे नागपूरकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे नागपूर महानरपालिका प्रशासन झोपेत असल्याचे दिसते. नागपूर महानगरपालिका (NMC) नागरिकांच्या नागरी तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात येत आहे. 4 ऑगस्ट रोजी सिव्हिल लाईन्स येथील एनएमसी मुख्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. याचदरम्यान आम्ही नागपूर महानगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ काभाराकडे लक्ष केंद्रीत करणार आहोत.