नागपूर : नागपुरातील गांधीसागर तलावाजवळील एम्प्रेस मिल परिसर शांतता आणि नयनरम्य भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र आता परिस्थिती वेगळी असून परिसरात होणाऱ्या कंस्ट्रक्शनमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहे. तसेच रहिवाशी राहत असलेल्या आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पूर्वी अतिशय स्वच्छ आणि निसर्गरम्य असलेल्या परिसराचे गैरव्यवस्थापनाच्या केंद्रात रूपांतर झाल्यामुळे रहिवासी निराश झाले आहेत.
‘नागपूर टुडे’ शी संवाद साधताना येथील नागरिकांनी त्यांना भेडसावत असलेल्या समस्या मांडल्या. परिसरात पहाटे 5:30 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या बांधकामामुळे नागरिकांना अपूर्ण झोप आणि आरोग्याशी संबधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सार्वजनिक जागा अस्वच्छ बनल्या-
कंस्ट्रक्शनमुळे याठिकाणी अनेक कामगार झोपड्या बांधून वास्तव्यास आहे. येथे काम करणारे मजदूर उघड्यावर शौचास जातात तसेच मोकळ्या जागेत आंघोळ करतात. कामगार वसाहतींमध्ये पुरेशा स्वच्छता सुविधांचा अभाव आहे. परिणामी, रस्त्यावर कचरा साचला असून, अस्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी आम्हाला दुर्गंधी असह्य होत असून आम्ही नाक झाकल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही, असे एका गृहिणीचे म्हणणे आहे.
अंमली पदार्थांच्या सेवनासाठी आश्रयस्थान-
तरुण -प्रौढ लोक येथे गटांमध्ये जमतात, खुलेआम अंमली पदार्थांचे सेवन करतात. अमली पदार्थांच्या सर्रास वापरामुळे स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे, विशेषत: पालक त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित आहेत.
नैसर्गिक सौंदर्याची हानी-
एकेकाळी स्थलांतरित पक्ष्यांनी भरलेली हिरवीगार जागा आता ओसाड पडली आहे. एकेकाळी निसर्गरम्य परिसरात असलेले हे ठिकाण बांधकामामुळे नाहीसे झाले.अगोदर आम्हाला तलावाजवळ स्थलांतरित पक्ष्यांचे कळप दिसायचे. आता सर्वत्र प्रदूषित पाणी आणि कचरा दिसतो, असे येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाने सांगितले.
महापालिकेचे तक्ररींकडे दुर्लक्ष –
बिघडलेल्या परिस्थितीमुळे रहिवाशांना दैनंदिन आव्हानांचा सामना करावा लागत आहे.स्थानिक रहिवाशांच्या संघटनेचे यासंदर्भात महापालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र महानगर पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. एम्प्रेस मिल परिसरातील वाढत्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या मागण्या –
• नियमन केलेले बांधकाम उपक्रम: बांधकामाचे काम पहाटे सुरू होणार नाही याची खात्री करण्यासाठी वेळेचे निर्बंध लादणे
• सुधारित ॲनिटेशन: उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखण्यासाठी मजुरांसाठी पुरेशी शौचालय आणि आंघोळीची सुविधा निर्माण करणे.
• वाढलेले सुरक्षा उपाय: अंमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नियमित पोलिस गस्त तैनात करणे.
• पर्यावरण पुनर्संचयित: नैसर्गिक अधिवास पुनर्संचयित करण्यासाठी वृक्षारोपण मोहीम सुरू करणे आणि परिसर स्वच्छ करणे.