नागपूर: भंडारा जिल्ह्याच्या लाखनीत उड्डाणपुलावर रविवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास बर्निंग मालवाहू ट्रकचा थरार पहायला मिळाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे आठवड्यात लाखनी उड्डाण पुलावरील गाडीला आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. गुजरात येथून किराणा साहित्य, पेंट्सचे डब्बे, पुस्तके घेऊन सीजी ०४, एचएक्स ९७३८ क्रमाकांचा हा ट्रक (CG 04, HX 9738) रायपुरकडे निघाला होता. दरम्यान, लाखनी उड्डाणपुलावर अचानक शार्टसर्किटमुळे आग लागली. पाठीमागून आलेल्या ट्रक चालकाने ही बाब ट्रकच्या चालकाला सांगितल्यावर ड्राइवर-क्लिनर वेळीच गाडी बाहेर निघाले. दरम्यान आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीने संपूर्ण ट्रकला आपल्या कवेत घेतले.
साकोली-भंडारा वरुन अग्निशमनदल बोलावण्यात आले. मात्र, तो पर्यत्न ट्रक जळून खाक झाला होता. घटने दरम्यान ट्रॅफिक जॅम झाल्याने मध्यरात्रीला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लाखनी आणि गडेगाव पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
एन. एच. 53 वर लाखनी उड्डाणपुलावर ट्रकला आग लागल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस स्टाफसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तत्काळ पुलावरून जाणारी व येणारी वाहतूक पुला खालून वळवली. स्थानिक पोलीसांच्या मदतीने पुलावरील वाहतूक बंद केली. भंडारा व साकोली येथून फायर ब्रिगेड बोलावून आग विझविण्यात आली आहे. सदर ट्रक हा वापी गुजरात येथून रायपूर छत्तीसगड येथे जात होता. ट्रकमध्ये किराणा साहित्य व पेंटचे डब्बे होते. ट्रक चालक रमन देशराज कुमार (रा. होशियारपूर, पंजाब) व क्लिनर अनिल ठाकरे हे सुखरूप आहेत. कोणतीही जीवित हानी झाली नाही.
यापूर्वी ६ मे २०२२ रोजी वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे धावत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली होती. या घटनेतही चालक आणि वाहक थोडक्यात बचावले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेल्या आगीत ट्रकमध्ये असलेले साहित्य जळून खाक झाले होते. अमरावती महामार्गावर तिवसा गावाच्या जवळ हा बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. कुणीही ही आग विझविण्याचा प्रयत्न न केल्यामुळे ट्रक जळून खाक झाला होता.