नागपूर : पावसाळा सुरु झाला तरी नागपुरातील अनेक परिसरात सिमेंट रस्त्यांचे काम सुरु आहे. लक्ष्मीनगर परिसरातील रहिवाश्यांना सिमेंट रस्त्यांच्या बांधकामामुळे अनेक समस्या भेडसावत आहेत.’नागपूर टुडे’शी बोलतांना रहिवाश्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे नागपूरमध्ये खोलगट भागात तर काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांमुळे घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनाही याचा समस्यांना तोंड दयावे लागले आहे. सिमेंट रस्त्यांची उंची वाढविल्या गेल्याने आजूबाजूला असलेल्या घरांची उंची कमी झाल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे मनपाच्या ढिसाळ कारभाराला जवाबदार ठरवले. वेळोवेळी नगरसेवक, मनपा प्रशासनाला सांगून कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने पावसाळ्यात या समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याने येथील नागरिकांनी रोष व्यक्त केला.
मनपातर्फे नागपुरातील गल्ली बोळ सिमेंटचे रस्ते बनविले जात आहे. त्यावर सध्या पावसाळ्यात रस्त्याची पातळी योग्य न राखल्यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी पावसाळी गटारात न जाता रस्त्यावरच साठत असून अस्वच्छता व दलदल निर्माण होत आहे. तरी या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती काळजी मनपाने घ्यावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर नागपूर महानगर पालिका काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.