नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराची स्थापना करणारे गोंड राजे बख्तबुलंद शहा आणि या राज घराण्यांत मृत्यू पावलेल्या राजांचे समाधीस्थळ सक्करदरा परिसरात आहे. या समाधीस्थळाला हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु सध्या या वारसा स्थळाची अवस्था दयनीय झाली आहे. ‘नागपूर टुडे’च्या टीमने यावर प्रकाश टाकला. नागपूरकरांना आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या शहराचे स्वप्न दाखवले जात आहे, पण निधीअभावी नष्ट होत असलेल्या वारशाचे काय? असा सवाल या स्थळाला पाहून उपस्थित करण्यात येत आहे. नागपूरची स्थापना करणाऱ्या गोंड राजाचे एक दुर्लक्षित समाधी स्थळ आहे. हे बहुतेक स्थानिकांना माहीतच नाही.
सध्या या स्थळाचे खंडर झाले असून नागपूर शहराच्या स्थापनेचा इतिहास सांगणाऱ्या समाधी स्थळाकडे पाहून चिंता निर्माण होते. गोंड राजे बख्तबुलंद शाह यांनी १६६८ ते १७०६ या कालावधीत ३८ वर्षे राज्य केले. त्यांनी १७०२ मध्ये नागपूर नगरीची स्थापना केली. सक्करदरा येथे गोंड राजांची विशाल स्मशान भूमी होती. राजघराण्यातील लोकांचा मृत्यू झाल्यानंतर या स्मशानभूमीत त्यांना दफविण्यात येत होते. या स्मशानभूमीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. आता फक्त २९ समाधी अस्तित्वात आहे. या समाधीसुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहे. जागेची मालकी नगर भूमापन विभागाचे मालमत्ता पत्रकानुसार न.भू. क्र.१७५ वर नागपूर सुधार प्रन्यासच्या नावाची अनधिकृत नोंद आहे.
दरम्यान गोंडवानाचा वैभवशाली इतिहास असलेल्या गोंड राजे यांचा राजघाट अतिक्रमण व दुर्लक्षित आहे. त्याचा तात्काळ राजघाटप्रमाणे विकास करून भावी पिढीकरिता वारसा जपावा,अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे.