नागपूर :शहरात 20 जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.अनेक ठिकाणी पाणी साचले तर नाले तुंबून वाहत होते. यातच यशवंत स्टेडियमच्या परिसरात असलेल्या नाल्याला सुरक्षाभिंत नसल्याने येथील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
तसेच नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या संकटाचा सामनाही करावा लागतो. नाल्याचा भाग मोकळा असल्याने दुर्दैवाने जर कोणता अपघात घडला तर त्याला जवाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे सुरक्षाभिंत नाल्यात गेली वाहून –
गेल्या वर्षी पडलेल्या पावसामुळे या नाल्याची सुरक्षा भिंत पाण्यात वाहून गेली होती. त्यानंतर अनेक महिने लोटूनही प्रशासनाने सुरक्षाभिंतीचे काम केले नाही. नाल्याच्या सुरक्षाभिंतीचे बांधकाम करण्यासाठी मटेरियल आणून ठेवले.मात्र त्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला नाही. मात्र तात्पुरती व्यवस्था म्हणून याठिकाणी टिनाने पत्र लावले होते.पण शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे ते टिनाचे पत्रेही पाण्यात वाहून गेल्याने नाल्याचा काही भाग मोकळा पडला आहे.
स्थानिकांच्या घरात शिरते पाणी –
नागपुरात गेल्या वर्षी ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने येथील अनेक घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते. 20 जुलै रोजी शनिवारी पडलेल्या पावसामुळे या भागातील नाला तुडुंब भरून वाहत होता. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे आणि हेच पाणी घरांमध्ये शिरल्याने स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रहदारीचा भाग असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका –
यशवंत स्टेडियम परिसरातील मागच्या बाजूला हा नाला असल्याने लागूनच वस्ती आहेत तर बाजूला दुकानांच्या रंगा आहेत. त्यामुळे याठिकाणाहून सायकल, दुचाकी वाहनासह कार सुद्धा जाते. तसेच नागरिक पायदळीही याठिकाणाहून जाणे -येणे करतात. हे पाहता नाल्याचा भाग मोकळा असल्याने दुर्दैवाने जर कोणता अपघात घडला तर त्याला जवाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
– आरती सोनकांबळे