मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीची प्रलंबित मतमोजणी पार पडणार आहे. तब्बल १८ दिवसानंतर ही मतमोजणी होत आहे. काही वेळापूर्वीच उस्मानाबाद तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच या निवडणुकीचे प्राथमिक कल हाती येतील.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या भावा-बहिणीतील राजकीय द्वंद्वामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक असणारे रमेश कराड यांना राष्ट्रवादीच्या गोटात दाखल करून धनंजय मुंडे यांनी भाजपावर कुरघोडी केली होती.
मात्र, ऐनवेळी रमेश कराड यांना निवडणुकीचा अर्ज मागे घ्यायला लावून पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने धनंजय मुंडे यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत रंगली होती. त्यामुळे आज या दोघांपैकी कोण बाजी मारणार यावर पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा अवलंबून आहे.