विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची आवड रुजावी – सावंत
रामटेक– रथसप्तमी निमित्त विद्याभारती रामटेकतर्फे सामूहिक सूर्यनमस्कार महायज्ञाचे श्रीराम शिक्षण संस्थेच्या भव्य पटांगणात पार पडले. यावेळी श्रीराम विद्यालय, श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय, श्रीराम कन्या विद्यालय, श्रीराम प्राथमिक शाळेच्या सातशे विद्यार्थ्यांनी समंत्र सामूहिक सूर्यनमस्कार पाच हजार काढले.
विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची आवड रुजावी, सूर्यनमस्काराच्या नियमित सरावाने सुदृढता वाढावी, यासाठी दरवर्षी रथसप्तमीच्या मुहूर्तावर विद्याभारतीतर्फे हे सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात येते. सूर्यनमस्काराच्या नियमित अभ्यासाने शरीर चपळ, मजबूत व बुद्धी तीक्ष्ण होते.
याप्रसंगी श्रीराम कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गेडेकर, श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर आकट, जयदेव डडोरे, पर्यवेक्षक मोहन काटोले, विद्याभारती पूर्व विदर्भ प्रमुख महेश सावंत, तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. संचालन बबलू यादव यांनी केले. आयोजनाकरिता सर्व शिक्षक व सर्व कर्मचार्यांनी सहकार्य केले. सूर्यनमस्कार हे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाचे एकमात्र साधन आहे, असे मत विदर्भ पूर्व विभाग प्रमुख महेश सावंत यांनी व्यक्त केले..