नागपूर : केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या “विकसित भारत संकल्प यात्रा” मोहिमेंतर्गत मंगळवार (ता२८) रोजी धरमपेठ झोन कार्यालय येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एका छताखाली प्राप्त होत असलेल्या केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ समस्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन्स अर्थात रथ मनपाच्या दहाही झोन मध्ये फिरणार असून, विविध शिबीर घेत नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविणार आहे.
धरमपेठ झोन कार्यालय येथे शिबिराचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमात मार्गदर्शन करीत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, “विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. मनपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे. मनपाद्वारे झोननिहाय पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना आणि ई-बस या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
याशिवाय शिबिरांमध्ये प्रधानमंत्री उज्जवला योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, पी.एम.स्वनिधी बद्दल माहिती तसेच असंसर्गजन्य आजार निदान व उपचार देखील दिल्या जात आहे. तरी संबंधित विभागांच्या समन्वयाने प्रत्येक झोनस्तरावर रथयात्रेद्वारे नागरिकांना लाभ देण्यात यावा अशा सूचना डॉ. चौधरी यांनी यावेळी केल्या.
विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये विविध योजनांत पात्र असूनही अद्याप लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ मिळवून देणे, योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी कार्यवाही मोहिमेद्वारे केली जात आहे.
वंचित समुदायासाठी असलेल्या योजनांच्या जनजागृतीचे ध्येय या विकसित भारत संकल्प यात्रेतून साध्य केले जाणार आहे. या वेळी उपायुक्त श्री. रवीन्द्र भेलावे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक आयुक्त, श्री. प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, अति. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी व ब्रॉड अम्बेसंडर श्रीमती किरण मूंदडा व लाभार्थी उपस्थित होते. या पुढे होणाऱ्या शिबीराची माहिती मनपाच्या संकेत स्थळ आणि सामाजिक माध्यमांवर उपलब्ध राहील.