मुंबई: विचारवंत आणि साहित्यिकांवर झालेल्या कारवाईसंदर्भात पुणे पोलीस आयुक्त आणि राज्यांच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांवर मुंबई उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना यासंदर्भात न्यायालयात पुरावे मांडण्यास सांगितले होते. मात्र पोलिसांनी न्यायालयात पुरावे मांडण्यापूर्वीच दोन-दोन पत्रकार परिषद घेऊन एक प्रकारे न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पुणे पोलीस आयुक्तांनी पहिली व त्यानंतर राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनीही पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून पोलिसांनी सरकारच्या समर्थनार्थ राजकीय भूमिका मांडण्याचा खटाटोप केला. अशी राजकीय भूमिका मांडायला पुणे पोलीस आयुक्त अन् राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सरकारचे प्रवक्ते आहेत का, असा प्रश्न मी दोन दिवसांपूर्वीच उपस्थित केला होता.
त्या विधानाला मुंबई उच्च न्यायालयाने आज ओढलेल्या ताशेऱ्यांमधून जणू पुष्टीच मिळाली आहे. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी; अन्यथा त्यांच्याच इशाऱ्यावर या पत्रकार परिषदा झाल्याचे स्पष्ट होईल, असे विखे पाटील पुढे म्हणाले.