हिंदी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत
नागपूर: विशुध्द राष्ट्रवादावर देशातील गावे, गरीब माणूस, मजूर, शेतकरी, उद्योजक आपल्या पायावर उभा राहावा, स्वयंपूर्ण व्हावा, हीच पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताची संकल्पना आहे. ही संकल्पना कुणाच्याही विरोधात नाही किंवा नकारात्मकही नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज हिंदी वृत्तवाहिनीला दिलेला मुलाखतीतून व्यक्त केले.
कोरोनामुळे आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी व ही लढाई जिंकण्यासाठी तसेच आर्थिक युध्दही जिंकण्यासाठी ही संकल्पना पंतप्रधानांनी मांडली आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले- समाजातील प्रत्येक घटकाला आपली प्रगती करण्याचा अधिकार आहे. आपली गुणवत्ता वाढविण्याचा अधिकार आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा अधिकार आहे. देशातील गरीब माणूस, ग्रामीण भागातील माणूस, मजूर, शेतकरी यांना सामर्थ्यशाली बनविणारी ही संकल्पना आहे. सकारात्मक दृष्टीने याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे असेही ते म्हणाले.
एका प्रश्नाच्या उत्तरात गडकरी म्हणाले- संरक्षण विभागाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ)ने चांगले काम केले आहे. चारधामला जाणारा रस्ता, अरुणाचलमध्ये, काश्मीरमध्ये त्यांनी केलेले काम चांगले आहे. आमचे शासन येण्यापूर्वी आणि आता त्यांच्या कामात काय फरक आहे, हे जनतेने जाणून घ्यावे. बीआरओच्या कामावर मी समाधानी आहे. मानसरोवरकडे जाणार्या रस्त्याचे कामही त्यांनी केले. उणे 8 डिग्री तापमानातही त्यांनी काम केले, हे कौतुकास्पद आहे, असेही गडकरी म्हणाले.
उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमच्या देशातील कंत्राटदारही मागे नसल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगताना ते म्हणाले- मोठे प्रकल्प करताना ‘टेक्निकल क्वालिफिकेशन आणि फायनान्शियल क्वालिफिकेशन’ यात सुधारणा करण्याची गरज आहे. तशा सूचना आपण संबंधित विभागाला दिल्या आहेत. आम्ही आमच्या कंत्राटदारांना/प्रकल्प सल्लागारांना ताकदवर, मजबूत बनवू. ते विदेशात जाऊन काम करू शकले पाहिजेत या योग्यतेचे बनवू. त्यांना प्रोत्साहन देऊ असेही ते म्हणाले.
सर्वच वस्तूचे उत्पादन आपल्या देशात झाले पाहिजे, असे आग्रहपूर्वक सांगताना गडकरींनी सांगितले की, आयात शुल्क आम्ही वाढविले आहे. लहान लहान वस्तू ज्या आपल्या देशात बनू शकतात, त्याची आयात करण्याचे काय कारण? आयात कमी करून निर्यात वाढविणे हे आत्मनिर्भरतेकडे जाणारे पाऊल आहे. चीनबद्दल आज जगातील अनेक देशांमधून जी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे, ती लक्षात घेता त्यांच्याशी कुणी व्यवहार करायला तयार नाही.
अनेक देशांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. अशा स्थितीत पर्याय म्हणून भारताकडे अनेक देश पाहात आहेत. कारण येथे लोकसंख्या आहे, बाजार मोठा आहे. कौशल्य आणि अभियांत्रिकी ज्ञान असलेला तरुण वर्ग आहे, कच्चा माल आहे, याचा फायदा नवीन कंपन्यांना निश्चितपणे होईल. जे तंत्रज्ञान आमच्या कंपन्यांकडे नाही, त्यासाठी परदेशातील कंपन्यांशी संयुक्तपणे करार करून ते उत्पादन आपल्या देशात बनविणे शक्य होऊ शकते. यामुळे परकीय गुंतवणूक या देशात येईल. रोजगार निर्माण होतील आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल. आर्थिक दृष्टीने हा देश, देशातील गरीब, मजूर, शेतकरी, उद्योजक स्वत÷च्या पायावर उभा राहावा, आत्मनिर्भर व्हावा ही भावना लोकांमध्ये निर्माण होणे महत्त्वाचे आहे, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात गडकरी म्हणाले.