मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत कारवाईला गती
नागपूर: नागपूर शहरातील फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणा विरोधात नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्वत्र धडक कारवाई सुरू आहे. मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे शहरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरातील कारवाईला गती देण्यात आली आहे.
सोमवारी २० फेब्रुवारी २०२३ रोजी मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शहरातील अतिक्रमण, अवैध पार्किंग, वाहतूक कोंडी आदी समस्यांच्या संदर्भात प्रलंबित जनहित याचिकेवर मा. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व वृशाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी मा. न्यायालयाने शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत आदेश दिले. यासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी सर्व अधिका-यांची बैठक घेतली. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत कारवाईला गती देउन प्रत्येक झोनमधील रस्ते आणि फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याचे त्यांनी निर्देशित केले.
नागपूर शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाद्वारे सुरू असलेल्या कारवाईला गती देण्यात आली असून पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने दहाही झोनमध्ये अतिक्रमण विरोधी धडक कारवाई सुरू आहे. प्रवर्तन विभागा मार्फत आतापर्यंत १७० पेक्षा जास्त अतिक्रमण हटविण्यात आले असून सुमारे ४ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहेत. इतर अतिक्रमण त्याच ठिकाणी पाडण्यात आले आहे. आशी नगर झोन अंतर्गत विटाभट्टी चौक येथील वनदेवी नगर नाल्या काठावरील अवैध पद्धतीने बांधण्यात आलेले फुटपाथ वरचे अंदाजे २७ अस्थाई घरे तोडण्यात आली.
हनुमान नगर झोन मधील तुकडोजी पुतळा ते क्रीडा चौक, रेशिमबाग चौक ते तिरंगा चौक, रेशिमबाग चौक ते क्रीडा चौक, तुकडोजी पुतळा ते अजनी पोलीस स्टेशन आणि तुकडोजी पुतळा ते मानेवाडा रोडपर्यंत अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे ४१ अतिक्रमण हटविले व १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. मानेवाडा चौकात अवैध पद्धतीने बांधण्यात आलेल्या ५ दुकानांचे बांधकाम तोडण्यात आले.
नेहरू नगर झोन अंतर्गत नेहरू नगर ते भांडे प्लॉट चौक, दिघोरी चौक ते गुरुदेव नगर चौक, गजानन नगर चौक ते सक्करदरा चौक आणि भांडे प्लॉट चौक पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. या कारवाईमध्ये अंदाजे २८ अतिक्रमण हटवून २ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
मंगळवारी झोन अंतर्गत मंगळवारी बाजार येथे अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. असे अंदाजे २८ अतिक्रमण हटविले व १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. त्या नंतर तक्रारी नुसार सदर येथे अवैध पद्धतीने बांधण्यात आलेले अंदाजे ५०० चौ.फु. टिनाचे शेड तोडण्यात आले.
धरमपेठ झोन अंतर्गत महाराजबाग परिसरातील टेडी बियर विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. झाशी राणी चौक ते मुंजे चौक ते व्हेरायटी चौक ते परत महाराजबाग रोड लता मंगेशकर दवाखाना समोरील परिसर पर्यंत अतिक्रमण कारवाई करण्यात आली, यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. अंदाजे ४२ अतिक्रमण हटवून परिसर मोकळे करण्यात आले.
गांधीबाग झोन क्र. 6 अंतर्गत राजविलास टाकीज समोरील दुकान नं. 3/4/21/25/27/29 येथे अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दुकानाचे ग्रील व शेटर काढण्यात आले. त्यानंतर अवैध पद्धतीने बांधलेले पुस्तकाची ३ दुकाने व चहा/नाश्ताची २ दुकाने तोडण्यात आली.
लक्ष्मी नगर झोन अंतर्गत लक्ष्मीनगर ते माटे चौक, प्रतापनगर चौक ते त्रिमूर्ती चौक, खामला ते जयताळा तसेच नागरिकांच्या तक्रारीनुसार प्रतापनगर ते त्रिमूर्ती नगर, जयताळा ते खामला ते आठ रस्ता चौक पर्यंत कारवाईमध्ये रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. या कारवाईमध्ये फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले भंगारचे दुकान हटविण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मिनी माता नगर येथे अतिक्रमण ची कारवाई करून परिसरातील रस्ते व फुटपाथ मोकळे करण्यात आले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण उपायुक्त श्री. अशोक पाटील यांच्या नेतृत्वातील चमूद्वारे शहरात सर्वत्र अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे.