नागपूर : शहरात एका दृष्टीहीन चिमुकलीने स्वातंत्र्य दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. ईश्वरी पांडे असे या १३ वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने ईश्वरीने अंबाझरी तलावात तब्बल अडीच किलोमीटर अंतर पोहत तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण करण्याची कामगिरी केली आहे. तब्बल अडीच किमी पोहून ईश्वरीने अंबाझरी तलावाच्या अगदी मध्यभागी ध्वजारोहण केल्याने तिचे सर्व सतरावरून कौतुक करण्यात येत आहे.
ईश्वरी पांडेची ही कामगिरी पाहण्यासाठी नागपूरकरांनी अंबाझरी तलावाजवळ गर्दी केली होती. यावेळी सर्व नागरिकांच्या हाती तिरंगा झेंडा होता. तसेच ईश्वरीला प्रोत्सहीत करण्यासाठी सर्वजण ‘भारत माता की जय’च्या घोषणाही दिल्या.
दरवर्षीप्रमाणे यंदाही २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला या तलावाच्या मध्यभागी पोहून तेथे ध्वज फडकवतात. सुमारे पाचशे मीटर अंतर पोहल्यानंतर पाण्याच्या वर एक ध्वज फडकवला जातो. दरवर्षी नवीन नवीन लोक यात भाग घेतात. मात्र यंदा दृष्टीहीन ईश्वरी पांडे हीने ही कामगिरी केल्याने सर्वानी टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केले. डोळे असणाऱ्या व्यक्तींना ते या चिमुकलीने करून दाखवल्याने तिची सर्वत्र चर्चा रंगली आहे.