Published On : Tue, Oct 27th, 2020

विवेका, सेव्हन स्टार हॉस्पिटलवर मनपाची कारवाई आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हीड उपचारा संदर्भातील दर व पध्दती निश्चीत केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या संबंधात ३१ ऑगस्ट २०२० ला आदेश पारित केले आहे. या आदेशाचे अनुसरुन नागपूर महानगरपालिकेव्दारे शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हीड रुग्णांची उपचारा संदर्भातील दर व पध्दती निश्चीत करण्यात आलेली आहे. सर्व संबंधीत रुग्णालयांना शासन अधिसूचना व मनपाव्दारे निर्गमित आदेशांचे अनुपालन करणे बंधनकारक आहे. मनपा आयुक्तांनी आदेशाची अंमलबजावणी संदर्भातील पडताळणी व पर्यवेक्षण करणे हेतु शहरातील विविध खाजगी रुग्णालयाचे पूर्व लेखा परिक्षण करण्याकरीता लेखा परिक्षकांची नियुक्ती केली आहे.

या पूर्व लेखा परिक्षकांचे अहवालावरुन मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी दोन रुग्णालयांवर अनुज्ञेय दरापेक्षा जास्त दर आकारण्यासाठी नोटीस निर्गमीत केले आहे. तसेच त्यांना ७६ रुग्णांचे अतिरिक्त घेतलेले एकूण २३ लक्ष ९६ हजार ०५० रुपये परत करण्याचे आदेश दिले आहे. या दोन हॉस्पीटलमध्ये सुभाषनगर येथील विवेका हॉस्पिटल आणि जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटल यांच्या समावेश आहे. मनपा आयुक्त यांच्या मार्गदर्शनात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व इतर अनुषंगीक कायद्यान्वये अंतर्गत दोनीही हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात लेखाधिकारी संजय मांडळे, सहायक लेखाधिकारी राजेश जिभकाटे, सहायक लेखाधिकारी राजू बावनकर, वरीष्ठ लेखाधिकारी अनील भुरे, सहायक लेखाधिकारी राजेंद्र चिंतलवार, कर निरीक्षक प्रदीप बागडे, डॉ.हर्षा मेश्राम, डॉ. साजीया शम्स यांनी ही तपासणीची कार्यवाही केली. मनपाच्या निर्देशांवर जास्तीत-जास्त दर आकारणारे खाजगी रुग्णालयांनी आतापर्यंत रु ३० लक्ष संबंधित रुग्णांना परत केले आहे.

मनपाद्वारे नियुक्त लेखा परीक्षकांद्वारे करण्यात आलेल्या परीक्षणात आढळल्या प्रमाणे, सुभाष नगर येथील विवेका हॉस्पीटल व्दारे कोव्हिड रुग्णांना शासन अधिसुचनेतील प्रपत्र ‘क’ नुसार दर न आकारता अतिरिक्त स्वरूपात ‘रिफ्रेशमेंट चार्जेस’, पी.पी.ई.किटचे अनुज्ञेय दरापेक्षा जादा दर आकारण्यात आल्याचे स्पष्ट झाले. सदर हॉस्पिटलद्वारे ५० रुग्णांकडून उपरोक्त स्वरूपात १७ लक्ष ९७ हजार ०४० रुपये जादा रक्कम वसूल करण्यात आली.

जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलनेही याप्रकारेच नियमांचे उल्लंघन करीत अतिरिक्त दर आकारल्याचे स्पष्ट झाले. हॉस्पिटलद्वारे अनुज्ञेय दरापेक्षा वेगळ्याने अतिरिक्त स्वरूपात ‘बायोमेडिकल वेस्ट हँडलिंग चार्ज’, ‘कोव्हिड स्टाफ मॅनेजमेंट चार्ज अँड इन्स्पेक्शन कंट्रोल अँड सॅनिटायजेशन चार्ज’ आणि ‘हाऊसकिपींग केअर अँड हायजिन मेंटेन चार्ज’ म्हणून ‘एक्सक्ल्यूझन क्रायटेरिया’ नमूद करून २६ रुग्णांकडून ५ लक्ष ९९ हजार रुपये अतिरिक्त वसूल केल्याचे स्पष्ट झाले.

दोनही रुग्णालयांवर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सदर रुग्णालयांनी अतिरिक्त आकारण्यात आलेल्या बिलाची रक्कम दोन दिवसांच्या आत रुग्णांना परत करणे अनिवार्य आहे. रुग्णालयांनी संबंधित रुग्णांना रक्कम परत केल्याच्या पुराव्यासह मनपा कार्यालयात अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशाद्वारे दिले आहे.

विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्यास संबंधित रुग्णालयाविरुद्ध साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा २०११, मुंबई सार्वजनिक न्यास कायदा १९५०, मुंबई नर्सिंग होम अमेंडमेंट ॲक्ट २००६, मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अमेंडमेंट ॲक्ट २००६ तसेच इतर अनुषांगिक कायद्यांन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.

Advertisement
Advertisement