नागपूर: विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर (व्हीएनआयटी)मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थाने महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दिव्यांशु गौतम असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विज्ञान अभियांत्रिकी (सीएसई) अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून त्याने आत्महत्येचे पाऊल का उचलले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील काही विद्यार्थांनी गौतमच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. गेल्या काही दिवसांपासून वसतिगृहाच्या आवारात गौतमही दिसत नव्हता. काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजाचे लॉक तोडून गौतमच्या खोलीत प्रवेश केला. त्यांना गौतम जमिनीवर पडलेला दिसला.
काही दिवसांपूर्वी गौतमने गळफास लावून आपले जीवन संपवले असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.