नागपूर :“जगातली सर्वात मोठी लोकशाही” असणाऱ्या भारत देशात “लोकशाहीचा महाउत्सव” साजरा होत आहे. मागील निवडणुकीत युवा मतदारांची टक्केवारी कमी होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत जागरूक राहत तरुणांनी स्वतःच्या कर्तव्याचे पालन करीत मतदान करावे, तसेच स्वतः सह कुटुंबीयांना व परिसरातील नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत जागरूक करण्याचे असे आवाहन जिल्हा परिषद नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांनी मतदारांना केले.
नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, स्वीप चमू आणि विवेका हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायक्लोथॉनच्या माध्यमातून हजार सायकलस्वारांनी मतदानाचा जागर करीत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून स्वीप अंतर्गत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा याकरिता रविवारी(ता.७) सकाळी अंबाझरी स्थित स्वामी विवेकानंद स्मारक येथे सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मनपा उपायुक्त डॉ. रंजना लाडे, श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त तथा धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे, श्री. घनश्याम पंधरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदाडे, विवेका हॉस्पिटलचे डॉ. मुकुंद ठाकूर, डॉ. अभिजीत देशमुख, डॉ. अजय साखरे, डॉ. निलेश मथनकर, डॉ. धृव बत्रा, डॉ. निखिल राठोड, डॉ. वेद महाजन प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात श्री रविंद्र परांजपे यांनी सर्व उपस्थित मतदारांना अधिकाधिक प्रमाणात मतदान करण्याकरिता शपथ दिली.
जिल्हा परिषद नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांनी सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखविला. स्वामी विवेकानंद स्मारक येथून “एक पाऊल आरोग्यदायी भविष्याकडे” यासंकाल्पनेवर आधारित या सायक्लोथॉनची सुरुवात झाली, सुभाष नगर चौक होत विवेका हॉस्पिटल्स, त्रिमूर्ती नगर चौक, दीनदयाल उपाध्याय चौक, राणा प्रतापनगर चौक, बोधिसत्त्व चौक(माटे चौक) शंकर नगर चौक, एलएडी चौक, धरमपेठ कॉलेज मार्गे सायकलस्वारांनी मतदानाचा जागर केला. सायकलस्वारांनी सायकल चालवीत मतदानाविषयी जनजागृती केली. स्वामी विवेकानंद स्मारक येथे सायक्लोथॉनची सांगता झाली, यावेळी मनपाचे अग्निशमन विभागाचे पथक व उपद्रव शोध पथकाचे जवान प्रामुख्याने उपस्थित होते.