नागपूर: मतदारांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी तसेच येत्या २० नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त संख्येत घराबाहेर पडून नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात आपले भरीव योगदान द्यावे याकरीता स्वीप अंतर्गत मनपाद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणून मनपाद्वारे वाहनांवर “आय विल वोट फॉर शुअर”चे स्टिकर लावण्यात येत आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी यांच्या शासकीय वाहनावर सुध्दा स्टिकर लावण्यात आले.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतः आपल्या वाहनावर “आय विल वोट फॉर शुअर”चे स्टिकर लावून उपक्रमाचा शुभारंभ केला. सिव्हिल लाईन्स स्थित जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात आयोजित छोटेखानी समारंभात अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री तुषार ठोंबरे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी श्री. अजय चारठाणकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. प्रवीण महिरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
“आय विल वोट फॉर शुअर”चे स्टिकरच्या माध्यमातून येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरातील मतदारांनी अधिकाधिक संख्येत घराबाहेर पडत मतदान करावे याचा संदेश दिला जात आहे.