Published On : Wed, Jun 26th, 2024

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान;कोण मारणार बाजी ?

Advertisement

मुंबई :विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणूकीत महायुती की महाविकास आघाडीपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात रस्सीखेच आहे. असे असले तरी मुंबई शिक्षक मतदार संघात, नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीच्याच घटक पक्षांमध्येही चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

मुंबई शिक्षक मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ज. मो. अभ्यंकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर भाजपकडून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे काम करणारे शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांनी यंदा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्याकडून सुभाष मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे महायुतीचा धर्म न पाळता एकनाथ शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे हे पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी नलावडे हे निवडणूक लढवत आहेत. अशाप्रकारे या मतदारसंघात पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून किरण शेलार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले आहे. या मतदारसंघात या दोघांमध्ये अतिशय चुरशीची अशी लढत होणार आहे.

Advertisement

नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथेही महायुतीचा धर्म न पाळता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं महेंद्र भावसार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अपक्ष म्हणून विवेक कोल्हे हे निवडणूक लढवत असल्यानं नाशिक शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे.

कोकण पदवीधर मतदार संघामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेकडून अभिजीत पानसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले होते. परंतु देवेंद्र फडवणीस यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघांमध्ये भाजपाकडून निरंजन डावखरे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. निरंजन डावखरे हे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर या मतदारसंघात काँग्रेसकडून रमेश कीर यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात निरंजन डावखरे विरुद्ध रमेश किर अशी लढत होणार आहे.