नागपूर – संसदेत वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. अनेक मुस्लिम नेत्यांनी आणि मौलानांनी वक्फ कायद्याच्या विरोधात शाहीन बागसारख्या आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरातील पोलीस व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री शहरात भव्य फ्लॅग मार्च काढण्यात आला. या फ्लॅग मार्चमध्ये सुमारे 5000 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. या फ्लॅग मार्चची सुरुवात मेयो चौकातून झाली आणि तो पोलीस मुख्यालयात जाऊन समाप्त झाला. मेयो चौक, अग्रसेन चौक, चितरोली चौक, केलीबाग रोड, बडकास चौक, जुनी मंगलवारी, गांधी गेट, तिलक पुतळा चौक, गांधी सागर चौक, कॉटन मार्केट चौक, बर्डी बाजार, व्हरायटी चौक आणि संविधान चौक असा हा मार्च मार्गक्रमण करत मुख्यालयात पोहोचला. नागपूरमध्ये नुकत्याच घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि येणाऱ्या रामनवमीसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून अत्यंत दक्षता घेतली जात आहे. शहरातील संवेदनशील भागांमध्ये फ्लॅग मार्चद्वारे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सोशल मीडियावर कठोर नजर-
नागपूरमधील हिंसाचारामागे सोशल मिडियावर व्हायरल झालेली खोटी माहिती कारणीभूत ठरली होती. या घटनेनंतर पोलीस विभागाने सोशल मिडियावर बारीक लक्ष ठेवले असून, द्वेष पसरवणारे, उकसवणारे पोस्ट करणाऱ्या खात्यांवर कडक कारवाई केली जात आहे. नागपूर पोलिसांनी अॅडव्हायजरी जारी करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही चिथावणीखोर पोस्ट केल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.शहरात शांतता व सौहार्द कायम राखण्यासाठी नागपूर पोलीस सज्ज आहेत.