नागपूर : एकीकडे राज्यात उन्हामुळे नागरिक हैराण झाले असताना हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती मिळाली आहे.हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे.
यामुळे वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात ताशी 40 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहून ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान या काळात राज्यात कमाल तापमान 35 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहील असेही हवामान विभागानं म्हटलं आहे. बाष्पयुक्त वातावरण आणि तापमानवाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत, त्यामुळे पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहील, असेही हवामान विभागाने म्हटकले आहे.
नागपूरसह विदर्भाची स्थिती काय?
दुसरीकडे विदर्भात उन्हाचा तडाखा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशावर पोहोचला. विदर्भातील ब्रह्मपुरी व अकोल्यामध्ये सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर गोंदिया, वाशिम, गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ या शहरांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. नागपूर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार विदर्भात पुढील दोन दिवस तापमान कायम राहणार असून, त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची निर्मिती होणार आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटसह वादळ वारा आणि पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.