नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ॲथलेटिक्स स्पर्धेत वॉरियर्स स्पोर्ट्स अकादमी साकोली संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. विभागीय क्रीडा संकुल मानकापुर येथील सिंथेटिक ट्रॅकवर ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली.
पाच दिवस चाललेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत १३६ स्पर्धा घेण्यात आल्या. यात सर्वाधिक १७३ गुणांसह वॉरियर्स स्पोर्ट्स अकादमी साकोली संघाने नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर संघाला (१५६) मागे टाकले. स्पर्धेत एचटीकेबीएस हिंगणाच्या चमूला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेमध्ये वॉरियर्स स्पोर्ट्स अकादमी साकोली संघाच्या १०४ ॲथलिटनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. जवळपास सर्वच क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवून खेळाडूंनी पदकांची कमाई करुन संघाला पहिल्या क्रमांकावर आणले. १६ वर्षाखालील मुलींच्या गटात वॉरियर्स स्पोर्ट्स अकादमी साकोली संघाने सर्वाधिक ४० गुणांची कमाई केली.
सातव्या खासदार क्रीडा महोत्सवातील ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये एकूण २३०० ॲथलिटने सहभाग नोंदविला होता. विजेत्यांना एकूण ७५ विजयी चषक आणि ६३० पदक प्रदान करण्यात आले. सर्व विजेत्यांना खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबूलकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शारिरीक शिक्षण विभाग संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, नीरज दोंतुलवार, अशफाक शेख, संदीप जाधव, राम वाणी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.